विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज (बुधवार, २ ऑगस्ट) औरंगजेबाचे स्टेटस लावण्यावरून गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि आमदार राणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही मुस्लीम युवकांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले, म्हणून त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल केले. पण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देत फुलं वाहिली. तसेच माझ्यावर कारवाई करुन दाखवा, असं आव्हान त्यांनी दिलं. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे जयपूर-मुंबई एक्स्प्रेस रेल्वेत निष्पाप मुस्लीम प्रवाशांची हत्या करण्यात आली, माझा मुस्लीम समाज सध्या आक्रोश करत आहे, पण सरकारकडून मुस्लीम समुदायाला बदनाम करण्याच काम सुरू आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला.

अबू आझमी विधानसभेत म्हणाले, “काही मुस्लीम युवकांनी औरंगजेबाचे स्टेटस लावला, म्हणून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ते ठीक आहे. पण मी इथे विचारू इच्छित आहे की, प्रकाश आंबेडर यांनीही औरंगजेबच्या कबरीला भेट दिली आणि कबरीवर फुलं वाहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी कुणाच्या हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवावा, असं आव्हान दिलं. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या देशात दोन प्रकारची कायदा व्यवस्था आहे का? असा माझा सरकारला प्रश्न आहे. एखाद्याने स्टेटस ठेवलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो आणि एक व्यक्ती गुन्हा दाखल करून दाखवा, असं आव्हान देत आहे, तरीही तुम्ही कोणतीही कारवाई करत नाही.”

हेही वाचा- मंचावर शरद पवारांशी हातमिळवणी न करता निघून का गेलात? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“जयपूर-मुंबई एक्स्प्रेस रेल्वेत जी घटना घडली, ती यामुळेच घडली आहे. सरकारकडून समाजात द्वेष पसरवला जात आहे. मुस्लीम लोकांना कशाही प्रकारे हिंदू बांधवांमध्ये बदनाम करा, अशाच प्रकारचं काम केलं जात आहे. आता परिस्थिती अशी आहे की, कुणाला बुरखा घालून किंवा दाढी वाढवून रेल्वेत प्रवास करण्याची हिंमतही होत नाही. त्यांना कोण आणि कधी मारेल, याची भीती वाटत आहे. माझा समाज सध्या आक्रोश करत आहे. पण कुणीही मदत करायला तयार नाही. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुस्लीमांची काहीही चूक नव्हती. सत्ताधारी पक्षातील लोक मला गद्दार म्हणतात. पण देशात नथुराम गोडसेचा फोटो लावला जातो. महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचा प्रचार केला जाऊ शकतो. हे सर्व जाणूनबुजून केलं जात आहे. देशाचं वातावरण खराब केलं जात आहे” असा आरोपही अबू आझमी यांनी केला.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अजित पवारांची मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया, म्हणाले…

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस सभागृहात म्हणाले, “प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबच्या कबरीवर गेले होते, तेव्हा मी त्यांना विनंती केली होती. शेवटी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाने बाबासाहेब आंबेडकरांना अनेक प्रकारची आमिषं दाखवली होती. तेव्हा आंबेडकरांनी सांगितलं की, या भूमीतला जो धर्म आहे, तोच धर्म मी स्वीकारेन. मी त्यांनाही (प्रकाश आंबेडकर) विनंती केली होती, की तुम्ही कबरीवर जाऊन महिमामंडन करू नका.”

हेही वाचा- “तू कार्यक्रमाला ये, दोन मिनिटं बोल आणि निघ”, अमित ठाकरेंनी राज ठाकरेंनाच दिला सल्ला, नेमकं प्रकरण काय?

“दोन धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे, औरंगाजेबच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही. ज्याप्रकारे काही युवक व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे, असं लिहितात, तो गुन्हा आहे. त्यामुळे मला अबू आझमींना सांगायचं आहे की, आपण लोकशाही पद्धतीने इथे निवडून येतो. प्रत्येकाला आपला मतदारसंघ पाहायचा असतो, आपली मतं पाहायची असतात. पण हे सर्व पाहत असताना काही गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात. अशा गोष्टींमध्ये आपण तडजोड करू नये. आपल्या देशाच्या इतिहासात देशासाठी बलिदान करणाऱ्यांमध्ये अनेक मुस्लीम नेते आहेत. ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं. त्यांना हा विचार कधीच केला नाही की, मी कुठल्या जातीचा आहे, हा देश कुठल्या धर्माचा आहे? किंवा इथे बहुसंख्यांक कोण आहे? त्यामुळे आपल्या सर्वांना राष्ट्रप्रथम ही भूमिका ठेवण्याची आवश्यकता आहे. राज्यात जाती-धर्माच्या आधारावर कुणाशीही भेदभाव केला जाणार नाही. पण जाणीवपूर्वक कुणी असं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असंही फडणवीस म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangazeb status on whatsapp issue discussed in vidhansabha abu azami and devendra fadnavis rmm