Noise levels during Ganesh festival : अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोसळलेल्या संततधार पावसामुळे आवाज फाऊंडेशनला विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या वाद्यांच्या आवाजाच्या पातळीची मोजणी करणे शक्य झाले नाही. परिणामी, आवाज फाऊंडेशनला यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यानच्या आवाजाच्या पातळीचा अहवाल सादर करता येणार नाही. गेली तब्बल २१ वर्षे आवाज फाऊंडेशनतर्फे यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येत होता.
गणेशोत्सवात मुक्त वातावरण असते आणि अशा वेळी ध्वनी प्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्रतेने होतो. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची पातळी असल्यास याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतो. यामुळे बहिरेपणा, रक्तदाब, हृदयरोग अशा विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता १५० डेसिबलपर्यंत पोहोचते. दरम्यान, ‘आवाज फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबई शहर आणि उपनगरांतील आवाजाची पातळी मोजली जाते.
फाऊंडेशनने २००३ पासून गणेशोत्सवातील आवाजाची पातळी मोजण्यास सुरुवात केली आहे. गेले अनेक वर्षे आवाजाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. तरीदेखील याबाबत सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची खंत आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली. विसर्जनाच्या दिवशी संततधार पाऊस पडत होता. पाऊस पडत असताना आवाजाची नोंद नीट होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा फाऊंडेशनकडून विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची पातळी मोजण्यात आली नाही.
आवाज संहिता काय सांगते ?
गणेशोत्सवादरम्यान रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत (शिथिल केलेल्या चार दिवसांत रात्री १२ ते सकाळी ६) ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. इतर वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर करताना आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबलपर्यंत आणि रात्री ४५ डेसिबलपर्यंतच असावी.
आवाजाची सर्वाधिक पातळी
आवाजाची सर्वाधिक पातळी २०२३ मध्ये ११४.७ डेसिबल, २०२२ मध्ये १२०.२ डेसिबल, २०२१ मध्ये ९३.१ डेसिबल, २०२० मध्ये १००.७ डेसिबल, तर २०१९ मध्ये १२१.३ डेसिबल होती. याचबरोबर गेल्या वर्षी पारंपरिक ढोलताशा वाजवूनही आवाजाची पातळी तेवढीच होती. ऑपेरा हाऊस आणि आणि वांद्रे पश्चिम येथे २०२४ मध्ये आवाजाची सर्वाधित पातळी ११५ डेसिबल इतकी होती.
ध्वनिप्रदूषणाबाबत आता नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. गणेशोत्सवात अनेक मंडळे ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेत असतात. तसेच यंदा ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी एक दिवस वाढवून दिला होता. सुमैरा अब्दुलअली, आवाज फाउंडेशन