मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीमधून आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपी आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीमधील संंबधांबाबत वांद्रे पोलीस तपास करीत आहेत. अटक आरोपीचे नाव विवेक सब्रवाल असून त्याच्याविरोधात देशभरात आठ सायबर गुन्हे दाखल आहेत. तसेच सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपीच्या सहभागाचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आर्थिक फसवणूक करण्यासाठी दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणारा दिल्लीतील रहिवासी विवेक उर्फ अमित सुनील सब्रवाल याला अखेर वांद्रे पोलिसांनी अटक केली. आरोपी दिल्ली परिसरातील बुराडी गावतील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही आठ सायबर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा गुन्हे दिल्ली व दोन गुन्हे मुंबईतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपीने बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डमध्ये सुरू करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
दिल्लीतील स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्याला रविवारी सकाळी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबई आणण्यात आले. यापूर्वी मुंबईत त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी बोरिवली येथील एका प्रकरणात आरोपीला जामिन मिळाला होता.आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्यामुळे सिद्दीकी यांच्या हत्येतील सहभाग व लॉरेन्स बिष्णोई टोळीशी आरोपीचा काही संंबंध आहे का ? याबाबतही पोलीस पडताळणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच आरोपीसोबत या गुन्ह्यांत कोणाचा सहभाग आहे ? मोबाइलचा ताबा मिळवण्यामागचा आरोपाचा हेतू काय होता ? याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, आरोपीचे वकिल तुषार लव्हाटे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपी निर्दोष आहे. त्याला संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याचा बाबा सिद्दीकी हत्येशी कोणताही संबंध नसल्याचे लव्हाटे यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमका काय प्रकार घडला
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया सिद्दीकी (३५) यांचे ‘फ्लेवर फूड व्हेंचर’ नावाचे हॉटेल आहे, तर पत्नी शेहझीन सिद्दीकी ‘झियर्स बिझनेस इंडिया एलएलपी’ नावाची रिअल इस्टेट कंपनी चालवतात. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी कुटुंबियांनी बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक सुरूच ठेवला आहे. हा मोबाइल क्रमांक वरील दोन्ही व्यवसायाशी संलग्न ठेवण्यात आला आहे. शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने २४ जून रोजी एक ई-मेल आला होता. त्यात बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकासाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काबाबत विचारणा करण्यात आली होती. या मेलबरोबर शेहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, वस्तू सेवा क्रमांक (जीएसटी) आणि कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडही वापरले होते.
आरोपीने दुसऱ्या सीमकार्डवर मोबाइल सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता. पण कंपनीनने संबंधित व्यक्तीला अर्ज प्राप्त झाल्याचे ई-मेलद्वारे कळवले होते. कंपनीने बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया यांना देखील ई-मेलच्या सीसीमध्ये ठेवले होते. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. याबाबत डॉ. अर्शिया यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) (फसवणूक करणे), ६२ (कैदेस पात्र असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न), ३३५ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ३३६ (२) व ३३६ (३) (दस्तऐवजांचे बनावटीकरण), आणि ३४० (२) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदी खऱ्या असल्याचे भासवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. बाबा सिद्दीकी यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.