मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या विस्तारासाठी वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम २०१९ पासून सुरू असून विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यातच पावसाळ्यात कामाचा वेग मंदावला होता. पण आता मात्र एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मे २०२८ उजाडण्याची शक्यता आहे.

एमएसआरडीसीने १७.१७ किमी लांबीचा आणि आठ मार्गिकांचा वांद्रे – वरळी सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र २०१९ – २२ दरम्यान प्रकल्पाचे केवळ अडीच टक्के काम पूर्ण झाले. २०२० – २२ मध्ये काम पूर्णत: बंद होते. करोना संकट आणि कंत्राटदाराच्या भागीदारीमध्ये आलेल्या अडचणी यामुळे काम बंद होते. शेवटी एमएसआरडीसीने कंत्राटदारावर भरमसाठ दंड आकारला. या दंडात्मक कारवाईनंतर अखेर मुख्य कंत्राटदाराने भागीदार कंत्राटदार बदलून कामाला सुरुवात केली.

२०२२ नंतर कामाने वेग घेतला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा प्रकल्पात अडचण निर्माण झाली. प्रकल्पातील जुहू कनेक्टरला मच्छीमारांचा विरोध असल्याने काम सुरू होऊ शकले नाही. मच्छीमारी व्यवसायाला फटका बसणार असल्याने मच्छीमारांनी कनेक्टरच्या मार्गात बदल करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून एमएसआरडीसीने कनेक्टरच्या मार्गात बदल केला, त्यात वेळ गेला आणि प्रकल्प एक ते दीड वर्षाने लांबला. पण आता मात्र हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने एमएसआरडीसीचे नियोजन आहे. त्यानुसार आता कामाला वेग दिल्याची माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली.

पावसाळ्यात समुद्रातील कोणतेही काम करता आले नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत कामाचा वेग मंदावला होता. पण आता पावसाळा संपल्याने कामास वेग देण्यात आला आहे. समुद्रातील कामे करण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रसामग्री आता प्रकल्पस्थळी दाखल झाल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. समुद्रातील कामांना आता वेग देण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आतापर्यंत अनेक तारखा देण्यात आल्या आहेत. आता मात्र मे २०२८ मध्ये काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.