उच्च न्यायालयाचा माकपला सल्ला
मुंबई : हजारो मैल दूरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या देशाला सतावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. गाझा आणि पॅलेस्टाईनमधील समस्यांकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या देशाकडे पाहा. देशभक्त व्हा, असा टिप्पणीवजा सल्ला उच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) दिला. तसेच, गाझा येथील कथित नरसंहाराच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी देण्याची पक्षाची मागणी फेटाळली.
आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या निर्णयाविरुद्ध माकपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आंदोलन करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. पक्षाची ही मागणी फेटाळताना न्यायामूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उपरोक्त टिप्पणीवजा सूचना केली.
हजारो मैल दूरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी याचिकाकर्त्यांनी देशाला सतावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या देशात बरेच प्रश्न आहेत. आम्हाला खेदाने म्हणावेसे वाटते की याचिकाकर्ते सर्वजण दूरदर्शी नाहीत. तुम्ही गाझा आणि पॅलेस्टाईनमधील समस्यांकडे पाहत आहात. तुमच्या स्वतःच्या देशाकडे पाहा. देशभक्त व्हा. ही देशभक्ती नाही, असे न्यायालयाने म्हटले.
संभाव्य राजनैतिक परिणामांबद्दल इशारा
तुम्ही देशातील नोंदणीकृत राजकीय संघटना आहात. कचऱ्याची विल्हेवाट, प्रदूषण, सांडपाणी, पूर यासारख्या मुद्द्यांवर आंदोलने का करत नाही, असा प्रश्न करताना तुम्हाला देशाबाहेर हजारो मैलांवर घडणाऱ्या गोष्टींचा निषेध करायचा आहे, असेही खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले. देशाचे परराष्ट्र धोरण याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे, याकडे न्यायालयाने लक्ष वेधून अशा निषेधांच्या संभाव्य राजनैतिक परिणामांबद्दल इशारा दिला.