मुंबई : ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या निमित्ताने मराठीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा प्रथमच अशा पद्धतीने आयोजित केला जात असून नावीन्यपूर्ण, विशेष रचित कार्यक्रम हे त्याचे वैशिष्टय़ असेल. या अशा कार्यक्रमात जुनेजाणते जसे सहभागी होतील तसे नवे, उद्याचे आश्वासक कलाकारही रसिकांना लुभावतील. ‘लोकसत्ता’मधून यापुढे दररोज अशा काही कार्यक्रमांची झलक सादर केली जाईल.

मराठी सारस्वताच्या प्रांगणात आपली काव्यजाणीव, काव्यलुब्धता आणि काव्यप्रभुत्व यामुळे ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे अरुणा ढेरे. या क्षेत्रात त्यांची नाळ आणि नाते थेट जुळते ते शांताबाई शेळके यांच्याशी. शांताबाईंनंतर मराठीचा काव्यकोश असेच अरुणा ढेरे यांचे वर्णन करता येईल. ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधे अरुणा ढेरे एक सत्र सादर करतील ते असे शुद्ध कवितेस वाहिलेले असेल. ‘मी आणि माझी कविता’ या एकरंगी काव्यसत्रात अरुणा ढेरे यांच्याकडून अनेक कवींच्या अनेकरंगी कवितांच्या रसग्रहणाची संधी रसिकांस मिळेल.

दुसरा असा अनोखा कार्यक्रम असेल मराठी मुशायऱ्याचा. दिवसभराच्या विविध सत्रांनंतर त्या दिवशीची ‘शाम-ए-लिटफेस्ट’ मराठी मुशायऱ्याचा लुफ्त अनुभवेल. तरुण शास्त्रीय गायक मंदार पिलवलकर आणि त्याचे सहकारी लिटफेस्टची संध्याकाळ ‘जश्न-ए-मराठी’ने रोशन करतील.  या आणि अशा कार्यक्रमांची वेळ, स्थळ, दिवस, मोफत प्रवेशिका, नावनोंदणी आदी तपशील याच ठिकाणी येत्या काही दिवसांत. त्यासाठी वाचत रहा दै. लोकसत्ता.

मुख्य प्रायोजक : सारस्वत को-ऑप बँक लिमिटेड

सहप्रायोजक : केसरी टूर्स

पॉवर्ड बाय पार्टनर : कौटिल्य मल्टिक्रिएशन