मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परिमॅच नावाच्या बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सूरत अशा सुमारे १५ ठिकाणी छापे टाकले. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने २०२४ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. ईडीच्या अधिकाऱ्याने या माहितीला दुजोरा दिला आहे.

प्राथमिक चौकशीनुसार बेटिंग अ‍ॅपमधून कमावलेली गैरव्यवहाराची रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा व्हायची. त्यातून पैशांची देवाण-घेवाण व्हायची. अशा प्रकारे एकूण दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम व्यवहारात आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर ती रक्कम कूट चलनात हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर तमिळनाडूतील एका भागातील एटीएममधून रोख पैसे काढण्यात आली तसेच छोटे व्यवहार यूपीआयद्वारे करण्यात आले. त्यामुळे आरोपींच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे शक्य नव्हते. ईडीने गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहारातील रकमेचा माग काढून हा संपूर्ण गैरव्यवहार उघड केला. याप्रकरणी मंगळवारी मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सूरत अशा सुमारे १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले.