राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमने (AIMIM) महाविकासआघाडीला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर भाजपाने एमआयएम मविआची बी टीम असल्याचा आरोप केला. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजपाची बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय. त्यामुळे भाजपाची विश्वासार्हता राहिली नसल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भास्कर जाधव म्हणाले, “भाजपाच्या बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय. त्यामुळे भाजपा कोणाबद्दल काहीही बोलली तरी त्यांच्या शब्दाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे भाजपा काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही.”

भाजपाने महाविकास आघाडीचा एक संजय घरी जाणार अशी टीका केली. यावर भास्कर जाधव यांनी भाजपाचे लोक काहीही वक्तव्य करत असतात. परंतु संध्याकाळी पाच वाजता वस्तूस्थिती काय हे सर्वांच्या डोळ्यासमोर येईल, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

“हवेत उडणाऱ्या भाजपाच्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल”

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “भाजपाने खूप मोठं संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं. परंतु आता एकदंर जे चित्र दिसतं आहे त्यातून आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये भाजपाबद्दल असंतोष आहे. तो असंतोष संध्याकाळी मतमोजणीच्या निमित्ताने स्पष्ट होईल. २० तारखेची निवडणूक सुद्धा भाजपाने आपल्या मतांच्या कोट्यापेक्षा अधिक उमेदवार उभे करून महाविकासआघाडीत खूप मोठा असंतोष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपाच्या हवेत उडणाऱ्या या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल.”

एमआयएमने मविआला पाठिंबा देताना काय म्हटलं?

इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पुढील ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे”

हेही वाचा : राज्यसभा निवडणुकीत MIM चा पाठिंबा कोणाला? इम्तियाज जलील यांनी केलं जाहीर; म्हणाले “शिवसेनेसोबत राजकीय मतभेद…”

“महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav answer allegations of bjp as aimim b team of mva pbs