झगमगाटात शनिवारी शिवस्मारकाचे जलपूजन; एक लाख कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

मराठा समाजाचे मोर्चे आणि आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (२४ डिसेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने फुंकले जाणार आहे. शिवसेना व भाजपमध्येच महापालिकेच्या कारभारावरून कलगीतुरा रंगला असताना आणि मेट्रो तीन प्रकल्पावरून वाद सुरू असताना मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नोटाबंदीच्या सावटाखालील हा समारंभ शाही झगमगाटात होणार असून शिवसृष्टी व शिवकालीन प्रसंग साकारत भाजपकडून त्याचा राजकीय लाभ उठविला जाणार आहे. स्मारकाच्या वचनपूर्तीबरोबरच रेल्वे, मेट्रो व एमएमआरडीएच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘करून दाखविले’ हा दावा भाजपकडून केला जात आहे.

नोटाबंदीच्या झळा आणि मंदीचे वातावरण अजूनही तीव्र असताना आगामी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी स्मारकाचे जलपूजन व मुंबईतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मोदी यांचे मुंबईत आगमन झाल्यावर ते अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाच्या जागी जातील. त्यासाठी तीन हॉवरक्राफ्ट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एका हॉवरक्राफ्टमध्ये पंतप्रधान मोदी व त्यांचा ताफा, दुसऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, ठाकरे, दोन पंडित, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे असतील. तिसऱ्या हॉवरक्राफ्टमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश राहील.

नौदलाच्या युद्धनौका, तटरक्षक दलाच्या नौका अरबी समुद्रात दोन-चार दिवस गस्त घालणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात भूमिपूजनाचा मुख्य समारंभ होणार असून त्यावेळी ठाकरे यांना मोदी यांच्याशेजारी आसन हवे आणि योग्य सन्मान राखला जावा, असा वाद होता. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘शिष्टाई’ करून तो मिटविला. ठाकरे मुंबई येथील समारंभात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे येथील कार्यक्रमात मोदींसमवेत व्यासपीठावर असतील. ठाकरे यांना भाषणाची संधीही दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचा निमंत्रण पत्रिकेत ‘विशेष सन्माननीय अतिथी’ असा उल्लेख करण्यात आला असून त्यावर केवळ पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू व नितीन गडकरी हे मंत्री आदी २१ जण मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहतील.

शिवराज्याभिषेकाच्या धर्तीवर तयारी

सुप्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई यांच्याकडे व्यासपीठाच्या सजावटीचे काम असून शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. जलपूजन झाल्यावर मोदी येण्याच्या मार्गात हाजीअली, मरिन ड्राइव्ह अशा चार-पाच ठिकाणी शिवकालीन प्रसंग साकारले जाणार आहेत. सरदार व मावळ्यांच्या वेशात सजलेले कलावंत त्यांचे स्वागत करतील, पोवाडे सादर केले जातील. भाजपनेही जोरदार तयारी केली असून प्रत्येक जिल्’ाातून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पवित्र नद्यांचे जल आणि ऐतिहासिक व पवित्र स्थळांच्या ठिकाणची माती कलशात जमा केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. सजविलेल्या रथातून हे कलश २३ तारखेला मुंबईत पोचतील व मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केले जातील. जलपूजेच्या जागेत हे पवित्र जल व माती अर्पण केली जाईल. शिवराज्याभिषेकाच्या धर्तीवर तयारी करण्यात येत आहे.

मोदी नोटाबंदीवर बोलणार?

नोटाबंदीच्या मुद्दय़ावर संसदेचे काम ठप्प झाल्यावर आणि निर्णयानंतर ५० दिवसांची मुदत संपण्याआधी सहा दिवस हा समारंभ होत असल्याने मोदी नोटाबंदीच्या मुद्दय़ावर काय बोलतात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

  • एक लाख कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन
  • रेल्वेचे सीएसटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरार उन्नत मार्ग
  • मेट्रोचे २ ब व ४ हे प्रकल्प
  • शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू
  • वरळी-शिवडी उन्नत मार्ग
  • वांद्रे-कुर्ला संकुलानजीक उड्डाण पूल
  • रेल्वे प्रकल्पांमध्ये ५० टक्के हिस्सा राज्य सरकारचा राहील
  • रेल्वे व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार केला जाईल