‘मी पुन्हा येईन’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा; म्हणाले “मी बदला घेणार, त्यांना…”

एकनाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे, फडणवीसांकडून कौतुक

‘मी पुन्हा येईन’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा; म्हणाले “मी बदला घेणार, त्यांना…”
एकनाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे, फडणवीसांकडून कौतुक

भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यातील नवीन सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदेचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन वाक्यावरुन टिंगटटवाळी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. अनेकवेळा राजकारणात पद मिळाल्यानंतर माणुसकी हरवतात, पण एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड माणुसकी आहे असं कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं म्हटल्यानंतर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. मी पुन्हा आलोच नाही तर यांनाही घेऊन आलो आहे. ज्यांनी अपमान, टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार. मी त्यांना माफ केलं हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सर्वांना संधी मिळते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

“एकनाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे, झोपतात कधी आणि जेवतात कधी कळत नाही. २४ तास काम करणारा हा नेता आहे. एखादी निवडणूक, अडचण असते तेव्हा तीन दिवस सलग ते काम करताना दिसतात. मोठ्यातल्या मोठं किंवा लहान व्यक्तीच्या मदतीला जाण्याची शिकवण त्यांना दिघेंनी दिली आहे. ज्यांचं कोणी नाही त्यांचे आनंद दिघे होते. हीच शिकवण त्यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे,” असं फडणवीस म्हणाले.

“लोकशाहीत दुसरा आवाज पटो किंवा न पटो ते ऐकून घेतलं पाहिजे. प्रत्युत्तर देण्यात काही चुकीचं नाही,” असंही फडणवीस म्हणाले. “महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली असता तात्काळ एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांना फोन केला होता. त्यादिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. मी त्यांना सगळे कार्यक्रम सोडून पोहोचण्यास सांगितलं. बोटीतून साप शिरत असतानाही त्यांनी प्रवास केला होता. काही पत्रकार अडकले होते त्यांनीही प्रत्यक्ष हे पाहिलं. आदिवासींच्या मोर्चाची व्यवस्थाही त्यांनी केली.

VIDEO: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार! पहा महाराष्ट्र विधिमंडळ विशेष अधिवेशन Live

“एकनाथ शिंदे आजही ४००-५०० लोकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांनी थोडी वेळ पाळली पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आहे. माणसं भेटली की ते रमतात, समस्या ऐकून घेतात,” असं फडणवीसांनी सांगितलं. शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील. त्यांच्यात खूप संयम आहे. त्यातूनच त्यांची जडण घडण झाली असावी असंही ते म्हणाले.

“शिंदेंनी बेताच्या स्थितीत नेतृत्व उभं केलं. त्यांची दोन मुलं अपघातात गेली तेव्हा कुटुंब तुटलं होतं. जीवनातलं सगळं संपलं असा भाव त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यावेळी दिघेंनी त्यांना ऊर्जा दिली आणि खरं नेतृत्व उभं केलं. नंतर त्यांनी स्वतपेक्षा जनतेचा विचार केला पाहिजे यातून काम सुरु केलं,” असं फडणवीसांनी सांगितलं.

“काही लोकांना आम्ही सत्तेसाठी काही करत आहोत असं वाटलं होतं. सत्ता आमचं साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्यासाठी उपकरण महणून आम्हाला सत्ता हवी आहे,” असं फडणवीस म्हणाले.

“माझ्या नेत्याने मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्यांनी घरी बसण्यास सांगितलं असतं तर तेही केलं असतं,” असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी पूर्ण ताकद आणि क्षमतेने मी उभा आहे. कारकीर्द अधिक यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्यात, माझ्यात कधी दुरावा, संघर्ष कुरघोडी दिसणार नाही असंही ते म्हणाले. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे असाही टोला त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis shivsena eknath shinde anand dighe floor test sgy

Next Story
रेल्वे स्थानकांतील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करणार, मध्य रेल्वेचा निर्णय
फोटो गॅलरी