आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर निवडून आणण्याचा निर्धार; तरुणाईला वळविण्यासाठी ‘भाजयुमो’ ही मैदानात

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढून भाजपचा महापौर निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने केला असून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मध्य मुंबईतील मराठी विभागांवर ‘लक्ष्य’ केंद्रित केले आहे. मुंबई भाजपबरोबरच मराठी तरुणांना भाजपकडे वळविण्यासाठी ‘भाजयुमो’ ही मैदानात उतरविण्यात आले आहे. शिवसेनेच्या युवासेनेला टक्कर देण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे.

शिवस्मारकाच्या जलपूजन व विकासकामांच्या भूमीपूजनानिमित्ताने भाजपने शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फारसे महत्व न देता हा समारंभ आयोजित केला व त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तर महापालिकेसाठी भाजप युती करण्याची शक्यताच नाही, शिवसेनेलाच पराजयाची भीती वाटत असेल, तर ते चर्चेसाठी पुढे येतील, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.

पण सर्व जागा लढविण्यासाठी व शिवसेनेच्या मध्यमुंबईतील बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यासाठी भाजपने वेगाने पावले टाकण्यासाठी सुरुवात केली आहे. अखिल भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन, मुंबई अध्यक्ष मोहित कंभोज यांनी लोअर परळ येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘युवा उर्जा’ कार्यक्रमाचे आयोजन रविवारी केले. त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हजेरी लावली व तरुणाईचे शक्तीप्रदर्शन केले. खासदार महाजन यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी स्नेहसंबंध असल्याने त्या शिवसेनेविरोधात कधीच आक्रमक भूमिका घेत नाहीत. पण महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजयुमोसह भाजपचे सर्व विभाग मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महाजन यांनी मोदी यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी व भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर मराठी तरुणांना भाजपकडे वळविण्यासाठी पावले टाकली आहेत.

मध्य मुंबईतील परळ, शिवडी, लालबाग, दादर परिसरातील ४३ प्रभागांमध्ये शिवसेनेकडे १७, मनसेकडे ९ व भाजपकडे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद असलेल्या विभागात खिंडार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

संघटना पातळीवर रोकडरहित व्यवहारांसाठी प्रयत्न

रोकडविरहित व्यवहारांचे प्रशिक्षणासाठी ‘भाजयुमोने’ ‘सुशासनासाठी डिजीटल क्रांती’ उपक्रमही रविवारपासून देशभरात ५०० हून अधिक जिल्ह्य़ांमध्ये सुरु केला असून ज्येष्ठ नागरिकांसह विविध स्तरांमधील नागरिकांना ते देण्यात येत आहे. यासाठी पूनम महाजन यांची आई रेखा महाजन यांनाही मोबाईलद्वारे व्यवहारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून  इमारतींच्या रखवालदारांसाठीही कार्यक्रमाचे आयोजन रविवारी केले होते.  नोटाबंदीमुळे होत असलेले जनतेचे हाल ३० डिसेंबरनंतरही बराच काळ सुरु राहण्याची चिन्हे असल्याने जनतेचा रोष कमी करण्यासाठी भाजपने आता रोकडमुक्त व्यवहारांना चालना देण्यासाठी संघटना पातळीवरही पावले टाकली आहेत.

सर्व जातीधर्माच्या तरूणांना भाजपकडे वळविण्याचे पूनम महाजन यांचे प्रयत्न सुरू असून  ‘मी तर कोकणातील मराठा समाजातील नेता’ आहे. भाजपने गेल्या काही महिन्यांमध्ये विविध जाती धर्माचे मेळावे सर्व विभागांमध्ये घेतले. मध्य मुंबईत कोकण महोत्सव, आरोग्य अभियान राबविले. आठवडी बाजारला शिवडीमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळात या भागावर अधिक लक्ष असेल.

अ‍ॅड आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष