शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गेला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यावर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनीही यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या एका अग्रलेखाचा उल्लेख करत रविवारी (१९ फेब्रुवारी) ट्वीट केलं आणि राऊतांना लक्ष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी केसरीतील ‘आधी कोणते राजकीय की सामाजिक’ या अग्रलेखात म्हटले आहे की,
विचारशक्तीस अनावर सोडून जे जे तरंग निघतील ते लेखणीने अगर तोंडाने सांगणाऱ्या गृहस्थामध्ये आणि वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थामध्ये काही विशेष फरक आहे, असे आम्ही मानत नाही.”

“रोज सकाळी टीव्हीवर वेगवेगळे हावभाव करून बोलणाऱ्या एका गृहस्थास महाराष्ट्र पाहू लागला की, लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या वरिल वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राचा सकाळचा ताजा अनुभवही असाच होता,” असं म्हणत आशिष शेलारांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला.

हेही वाचा : “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले होते, “माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.”

“२ हजार कोटींचं डील झालं आहे”

“जे लोक न्याय आणि निर्णय विकत घेतात त्यांच्याबाबत काय बोलणार? मात्र माझ्या पर्यंत मिळालेली खात्रीलायक माहिती अशी आहे की २ हजार कोटींचं डील आत्तापर्यंत झालं आहे. पुरावे लवकरच देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल. जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेच. त्या नेत्याने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २ हजार कोटींचं डील केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किती मोठं डील झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. जो निर्णय आला आहे तो न्याय नाही तो फक्त एक सौदा आहे,” असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

व्हिडीओ पाहा :

“भारतीय जनता पक्षाला वाटलं तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झालं आहे. मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे. आमच्याकडून आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यात आलं आहे त्यासाठी हे एवढं मोठं डील झालं आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ashish shelar answer allegations of two thousand crore corruption by sanjay raut pbs