ठाकरे गटांचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मेट्रो-६ च्या कारशेडसाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून राज्य सरकार जोरदार टीकास्र सोडलं. कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात घालणार?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!

काय म्हणाले प्रसाद लाड?

“आदित्य ठाकरेंना महापालिकेतून पैसे खाण्याची सवय लागली आहे. त्यांना सातत्याने वाटतं की, आपल्याला पैसे मिळणार होते. पण त्यांना आता पैसे खाता येत नाही. त्यामुळे ‘जो खाई त्याला खवखवे’ अशी त्यांची परिस्थिती आहे. खरं तर जे भ्रष्टाचार करतात, त्यांनाच भ्रष्टाचार दिसतो. मुळात ती जागा केंद्र सरकारची होती, केंद्र सरकारने ती राज्य सरकारला दिली आणि राज्य सरकारने ती जागा एमएमआरडीएला दिली. मग यात १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला कुठे?” असं प्रत्युत्तर आमदार प्रसाद लाड यांनी दिलं.

“…म्हणून आदित्य ठाकरेंचा तळतळाट सुरू आहे”

“ज्या लोकांनी अडीच वर्ष कंत्राटदारांवर दबाव आणून मेट्रोचं काम बंद ठेवलं. त्यांना शिंदे-फडणवीस सरकारवर बोलण्याचा कोणताही अधिकारी नाही. आरे कारशेडच्याबाबतीत राज्य सरकार, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि लवादा यांनी मान्यता दिली होती. पण ज्या प्रकारे गोरगावचं कारशेड बंद पाडून कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनवण्याचा प्रयत्न झाला. यात १०० टक्के भ्रष्टाचार होता. आज त्यांना ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’साठी पैसे मिळत नाहीत. म्हणून त्यांचा तळतळाट सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO : “कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले”; अमरावतीत राणा दाम्पत्यासमोरच घोषणाबाजी!

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “महसूल खात्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना मेट्रो-६ साठी कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही अडीच वर्षांपासून बोलतोय की मेट्रो-६ साठी कारशेड गरजेचं आहे. कारशेडविना २०१८ साली कंत्राट काढण्यात आलं होतं. नंतर कारशेड बनवणार कुठे हा प्रश्न होता. आता कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का?” अशी टीका त्यांनी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla prasad lad replied to aditya thackeray allegation on metro 6 carshed spb