मुंबईसह कोकणात शिवसेनेची ताकद असल्याने त्यांचा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजपने व्यूहरचना केली आहे. कोकणातील सुमारे चार हजार गावांमध्ये मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना ‘संपर्क गावप्रमुख’ म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत. मुंबईसह ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक व अन्य नेत्यांना भाजपमध्ये आणून शिवसेनेला दणका देण्यासाठी  पावले टाकण्यात आली आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका संध्या यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यास सुरुवात केली आहे.

आगामी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेशी युती न करता त्या स्वबळावर जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेची खरी ताकद मुंबईसह कोकणात असल्याने ती खिळखिळी करून भाजपचे पाय मजबुतीने रोवण्यासाठी व्यूहरचना केली आहे. मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना भाजपच्या कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आणण्यात येत आहे. त्यांचा मेळावाही परळ येथील शिरोडकर हॉलमध्ये झाला. कोकणातील ३८२५ गावांमध्ये भाजपचे संपर्क गावप्रमुख नियुक्त करण्यात येत असून ५०० जणांच्या घोषणाही करण्यात आल्या. कोकणातील प्रत्येक गावांमध्ये व घराघरात पोचण्याचे भाजपचे प्रयत्न असून शिवसेनेची ताकद खच्ची करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. महापालिका निवडणुकांमध्येच नाही, तर पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही त्याचा भाजपला लाभ होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अ‍ॅड. शेलार यांनी निर्णय घेतले आहेत व पुढील काही दिवसांमध्ये त्यादृष्टीने हालचाली होतील. मुंबईतील नगरसेविका यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला असून मुंबई-ठाण्यातील काही शिवसेना नेत्यांशी वाटाघाटी सुरू आहेत, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आशीष शेलार यांचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्ला

कोकणची ओळख काही पक्षांनी राडेबाज व हप्तेबाज अशी केल्याचे प्रतिपादन करीत मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी शिवसेना आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढविला आहे. भाजपने कोकणी माणसाची ओळख सुसंस्कृत व विकासाभिमुख केली आणि भाजपच कोकणाचा विकास करणार, असे शेलार यांनी स्पष्ट केले. कोकणात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प, रिफायनरी, मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणास, रेल्वे विकासास भाजपने गती दिल्याचे त्यांनी सांगितले.