मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात जीवदान मिळाल्यानंतर उपचारासाठी सातारा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेल्या काळा बिबट्याला (मेलॅनिस्टिक लेपर्ड) आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे. या बिबट्यावर उपचार करणाऱ्या वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची बदली मुंबईत झाल्यामुळे त्याला देखरेख आणि उपचारासाठी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पाटगाव येथे साधारण ६ ते ७ महिने वयाचा काळ्या रंगाचा नर बिबट्या आढळला होता. प्रथमदर्शनी उपासमारीमुळे तो निपचित पडल्याचे सांगण्यात आले होते. या बिबट्यावर सातारा वनविभागातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर, कोल्हापूर वनविभागाचे डॉ. संतोष वाळवेकर आणि कोल्हापूरचे पशुपर्यवेक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार करण्यात येत होते. देवरुख किंवा रत्नागिरीमध्ये बिबट्याकरिता वैद्यकीय सुविधा नसल्याने, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपचारासाठी या बिबट्याला सातारा वनविभागामधील टीटीसी सेंटरमध्ये पाठवण्यात आले.
तेथे बिबट्यावर उपचार करण्यारे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बनगर १ ऑक्टोबरपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी पदावर रुजू झाले आहेत. बिबट्यावर वैद्यकीय उपचार करण्याची जबाबदारी डॉ. बनगर यांच्याकडे होती. त्यांची नियुक्ती राष्ट्रीय उद्यानात झाल्यामुळे, तसेच बिबट्यावरील वैद्यकीय उपचाराची माहिती बनगर यांना असल्यामुळे काळ्या बिबट्याला राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे.
वैद्यकीय उपचार कोणते ?
बिबट्याला सातारा वनविभागामधील टिटिसी सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर त्याला आणखी काही गंभीर समस्या असल्याचे निष्पन्न झाले. फ्रॅक्चर, न्यूरॉलॉजिकल डिसॉर्डर यासारख्या गंभीर गोष्टी निदर्शनास आल्या. त्यामुळे बिबट्याच्या पायावर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शल्यचिकित्सक विभागाच्या चमूने आणि डॉ. बनगर यांनी ही शस्त्रक्रिया केली, असे सूत्रांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. आता आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. यासंबंधी डॉ. बनगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
राष्ट्रीय उद्यानात काळ्या बिबट्याला आणण्यात आले आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणारे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची राष्ट्रीय उद्यानात बदली झाली आहे. त्यांना या बिबट्याची संपूर्ण माहिती असल्यामुळे, तसेच ते स्वतः उपचार करत असल्यामुळे बिबट्याला राष्ट्रीय उद्यानात आणले आहे. – अनिता पाटील, वन संरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्र्रीय उद्यान, बोरिवली