मुंबई : देवनार कचराभूमीतील अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून नवयुग इंजिनीअरिंग कंपनीला हे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या कंपनीने आधी ७ टक्के अधिक दराने बोली लावली होती. त्याचे दर ४ टक्क्यांनी कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश आले असून आता ३ टक्के अधिक दराने कंत्राट दिले जाणार आहे.
प्रकल्पाचा खर्च २४४० कोटी रुपयांवर गेला असून पुढील आठवड्यात कंत्राट देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २३६८ कोटी रुपये खर्च अंदाजित होता. नवयुग कंपनीने ७ टक्के अधिक दराने बोली लावली होती. त्यामुळे कामाचा खर्च २,५४० कोटी रुपये पोहोचणार होता. प्रशासन जुलै महिन्यापासून या कंपनीबरोबर वाटाघाटी करीत होते. अखेर कंपनीने दर ४ टक्क्यांनी कमी केले असून आता ३ टक्के अधिक दराने कंपनीला हे काम दिले जाणार आहे.
देवनार कचराभूमीत अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदांची प्रक्रिया जुलै महिन्यातच पूर्ण झाली होती. केवळ तीन कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरल्या होत्या. त्यात नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लि. आणि आरई सस्टेनेबिलिटी आणि एच. जी. इन्फ्रा इंजिनीअरिंग लि. या तीन कंपन्यांचा समावेश होता. त्यापैकी नवयुग या कंपनीचे दर सर्वात कमी असल्यामुळे त्यांची निवड जुलै महिन्यात करण्यात आली होती. मात्र कंपनीला अद्याप कार्यादेश देण्यात आले नव्हते.
देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याकरीता या जागेवरील अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर हा जुना कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी झाला आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली असून महसूल व वन विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती.
अदानी कंपनीसोबत संयुक्त भागीदारीचा इतिहास …
नवयुग कंपनीने अदानी कंपनीसोबत संयुक्त भागीदारीत विजयवाडा बायपास प्रकल्प राबवला आहे. नवयुग कंपनीचा आर्थिक देकार सर्वात कमी होता. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नवयुग कंपनी १९८६ मध्ये स्थापन झाली आहे. कंपनीचे १५ हजार कामगार असून साडेनऊ हजार कोटींची उलाढाल आहे.
१८५ लाख मेट्रीक टन कचरा
देवनार कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवावा लागणार आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत.
असा असेल कामाचे स्वरुप
एकूण जुन्या कचऱ्याचे अंदाजित वजन – १८५ लाख मेट्रीक टन
एकूण व्याप्त जागा – ११० हेक्टर
कंत्राट कालावधी – तीन वर्षे (पावसाळासहित)
दरदिवशी कचऱ्याची विल्हेवाट – २३ हजार मेट्रीक टन
दर दिवशी वाहनांची ये – जा – १२०० प्रतिदिन