भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटवरून दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भांडुपमधील पोटनिवडणुकीत मुंबईकरांनी भाजपला साथ दिली. त्यासाठी मुंबईकरांचे आभार. पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपने विजय मिळवला. यानिमित्ताने मुंबईकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. भाजपच्या विकासाच्या मुद्द्याला साथ दिली. त्यामुळे आता वेडे कोण ठरले हे सांगा, असा सवाल त्यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या धोरणांची खिल्ली उडवण्यासाठी सोशल मीडियावर ‘विकास पागल हो गया’ हा हॅशटॅग वापरला जात आहे. त्या अनुषंगाने शेलार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. मात्र, या ट्विवटरमध्ये त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये विरोधकांवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे आता भाजपच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
पोटनिवडणूकीतही भाजपलाच मुंबईकरांची साथ! भांडूपमधे भाजपा उमेदवार जागृती पाटील यांचा विजय… मुंबईकरांचे, भांडुपकरांचे आभार!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2017
पोटनिवडणूकीत मोठे दावे करणार्यांचे पोटफाडून भाजपाचा विजय… कार्यकर्त्तांचे अभिनंदन!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2017
? 2 Mumbaikars & Bhandup residents, 4 d resounding victory mandate 2 our candidate Smt. Jagruti Patil ! 1/3
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2017
BMC byelecn victory is credit 2 transparent ppl oriented wrk of @narendramodi ji @Dev_Fadnavis Ji @AmitShah ji @raosahebdanve 2/3
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2017
भांडुपचा विजय विनम्रपणे स्विकारतो.. या विजयातून काही राजकीय संकेत मिळाले आहेत. त्यादुष्ठीने आता पुढच्या कामाला सुरूवात करू!! pic.twitter.com/62oV7xWqQ7
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2017
दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांना तब्बल ११,१२९ मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना केवळ ६३३७ मतं पडली आहेत. भांडुप येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये बदल होणार आहे.. सध्या भाजपचे निवडून आलेले ८२ नगरसेवक आहेत. तर २ अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ ८४ आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचे संख्याबळ ८५ झाले आहे. सध्याच्या घडीला शिवसेना ८८, भाजप दोन अपक्षासह ८५, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे, ७ , समाजवादी पार्टी ६ आणि एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे जागृती पाटील यांच्या विजयाने भाजपची सभागृहातील ताकद वाढली आहे.