मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा सोमवार, १६ जून २०२५ पासून सुरू होत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोरिवली (पश्चिम) येथील पोईसर महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

उन्हाळी सुट्टी संपून सोमवार, १६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळाही सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बोरिवली येथील शाळेत पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्वत: उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचबरोबर यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. पोयसर महापालिका शाळेत गगराणी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र अनेक वैळा शालोपयोगी साहित्याच्या खरेदीला विलंब झाल्यामुळे निम्मे वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना या वस्तू मिळत नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाने नियोजन करून खरेदीचे वेळापत्रक जुळवून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वस्तू मिळतील याकरीता प्रयत्न केले. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा एप्रिल महिन्यातच शालोपयोगी साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना कोणत्या वस्तू देणार…

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालोपयोगी साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, त्यांना त्याच दिवशी हे साहित्य मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित होताच हे साहित्य देण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

– मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची स्थापना १९०७ मध्ये करण्यात आली. सध्या महानगरपालिका शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते.

– मुंबई महानगरपालिकेतील बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार आहे.

– या साहित्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होतो. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत. – इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या अभ्यासासह आधुनिक पद्धतीचाही सराव व्हावा, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शालेय वेळेत टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.