मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा नेला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या मारहाण झालेल्या अधिकाऱ्याकडून अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती. ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली. परंतु, यावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी तर शिवसेना शाखेवरील कारवाईवरून महापालिकेतील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. त्यांच्याच नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आज मोर्चा काढण्यात आला आहे.

यापाठोपाठ आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करू असं पोलीस सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला सांगितलं. वाकोला पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात ते पोलीस ठाण्यात जातील, तिथे संबंधित अधिकाऱ्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. त्यानंतर मारहाण करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.

हे ही वाचा >> “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या वारीला येताना मटणाचा बेत!”, आमदार अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले…

दूषित पाणीप्रश्नी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी हा मोर्चा काढला होता. परंतु शिवसेनेची शाखा तोडल्याचा राग उफाळून आल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. वाकोला पोलिसांनी याबद्दल सांगितलं की अद्याप याप्रकरणी तक्रार प्राप्त झालेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc officers beaten by shivsena thackeray group workers mumbai h east ward anil parab asc