इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाल्यांमध्ये समुद्रातून वाहत येणारा तरंगता कचरा अडवण्यासाठी महानगरपालिकेने बसवलेली ‘ट्रॅश ब्रूम’ कुचकामी ठरले आहे. तीन वर्षांच्या आतच ही यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे अन्य ठिकाणी असे ‘ट्रॅश ब्रूम’ न बसवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईतील नदी, नाल्यांमधील तरंगता कचरा महानगरपालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपट्ट्यांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा, तसेच समुद्रातून येणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा तरंगता कचरा अडवण्यासाठी महानगरपालिकेने पहिल्यांदा २०१८ मध्ये लव्हग्रोव्ह व इर्ला उदंचन केंद्र येथे ‘ट्रॅश ब्रूम’ बसवले होते. त्यावेळी या यंत्रणेचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये महानगरपालिकेने आठ ठिकाणी सरकत्या पट्ट्यांसह ‘ट्रॅश ब्रूम’ बसवले होते. तसेच मिठी नदीवरही अशी यंत्रणा उभारण्याचे ठरवले होते. मात्र ही यंत्रणा यशस्वी ठरत नसल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा >>> कारवाई टाळणे हा न्यायालयाचा अवमान, मशिदींवरील ध्वनिक्षेपकांवरून उच्च न्यायालयाने पोलिसांना पुन्हा फटकारले

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरकत्या पट्ट्यांची यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे त्यांनी सांगितले. तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे ही यंत्रणा अन्य ठिकाणी न बसविण्याचा निर्णय घेतल्याचेही ते स्पष्ट केले.

४५ कोटी रुपये वाया

‘ट्रॅश बूम’सह सरकता पट्टा बसवून तरंगता कचरा अडवणे, तो संकलित करून बाहेर काढणे यासाठी आवश्यक यंत्रणेचा पुरवठा, स्थापना, चाचणी व कार्यान्वित करणे, संकलित कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच संपूर्ण यंत्रणेचे पुढील तीन वर्षे प्रचालन व परिरक्षण करणे अशा एकत्रित कामासाठी ४५ कोटी २० लाख रुपये किमतीचे कंत्राट देण्यात आले होते. ‘ट्रॅश ब्रूम’ प्रणालीच्या स्थापनेची किंमत एकूण १३ कोटी ४६ लाख रुपये होती. तर पुढील तीन वर्षांकरीता या प्रणालीतून कचरा संकलित करणे, बाहेर काढणे, काढलेला कचरा वाहून नेणे, वाहून नेल्यानंतर त्याची योग्यरितीने विल्हेवाट लावणे या संपूर्ण प्रचालन व परिरक्षण कामाचा एकूण ३१ कोटी ७३ लाख रुपये खर्च आहे. मात्र हा निधी वाया गेला आहे. येथे बसवले होते ‘ट्रॅश ब्रूम’ आतापर्यंत पश्चिम उपनगरातील जुहूतील गझधरबंध नाला, तसेच मेन अव्हेन्यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोइसर नदी, दहिसर नदी, वाकोला नदी, तर पूर्व उपनगरातील मिठी नदी (वांद्रे – कुर्ला संकूल जोडपूल) येथे ‘ट्रॅश ब्रूम’ प्रणाली बसविण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc trash broom system fix in drains proved ineffective as frequent malfunctions mumbai print news zws