मुंबईः पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चौघांची हत्या केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा(आरपीएफ) बडतर्फ जवान चेतन सिंह याच्या विरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी सोमवारी अतिरिक्त पुरावे दिंडोशी सत्र न्यायालयात सादर केले.

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै, २०२३ ला झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी पुंगळ्या जप्त केल्या होत्या. तसेच रायफलसह त्याही बॅलेस्टिक अहवालासाठी पाठवण्यात आल्या आहेत. सिंह याच्याकडे सेमी ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल होती. त्याच्याकडे २० काडतुसे होते. त्यातील १२ गोळ्या त्याने घटनेच्या दिवशी झाडल्या होत्या. सिंहच्या रायफलमधील मॅगझीनमधून आठ जिवंत काडतुसे सापडली होती. ती जप्त करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांना रेल्वेतील एक सीसीटीव्ही चित्रीकरण सापडले आहे. त्यात आरोपी दिसत आहे. तसेच चेतन सिंहच्या हल्ल्यानंतर काही प्रवाशांनी दूरध्वनी केले होते. त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहेत. याशिवाय हत्येनंतर चेतन सिंहची एक ध्वनी चित्रफीत वायरल झाली होती. ती चेतनचीच असल्याचे न्यायवैधक प्रयोगशाळेतील चाचणीत स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – कांजूरमार्ग कारशेडच्या कामाचा मार्ग मोकळा होणार? मेट्रो ६ मार्गिकेतील कारशेडची निविदा अंतिम होण्याची शक्यता

या सर्व पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. आरोपी चेतन सिंह विरोधात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला (४८), अख्तर अब्बास अली (४८) यांच्यासह हैदराबादच्या नामपल्ली विभागातील रहिवासी सैयद सैफुल्लाह यांच्या हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी चेतन सिंहविरोधात भादंवि कलम ३०२, १५३ अ, ३४१, ३४२, ३६३ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, २७ व भारतीय रेल्वे कायदा कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा – विषारी अन्नपदार्थ खाऊन पवईत तीन श्वानांचा मृत्यू- आज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा

याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी अतिरिक्त पुरावे न्यायालयात सादर केले असून त्यात आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरचा सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरोपी सिंहला अकोला तुरुंगात ठेवण्यात आहे. त्याला मुंबई जवळील कारागृहात ठेवण्यात यावे, यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती चेतनच्या वतीने वकील अमित मिश्रा यांनी दिली.