मुंबई : रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत तीन श्वानांच मृत्यू झाला आहे. त्यात एका श्वानावर उपचार सुरू असून याबाबत पार्कसाईट पोलिसांनी आज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू
पवईच्या सनसिटी सोसायटीच्या परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. या परिसरातील चार श्वानांनी रस्त्यावर फेकलेले काही अन्न पदार्थ खाल्ले होते. त्यानंतर ते श्वान अत्यावस्थ अवस्थेत सापडले. सोसायटीच्या एका सुरक्षारक्षकाने ही माहिती तेथे राहणाऱ्या ट्रीजा टेकेकरा या महिलेला दिली. तिने तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले. त्यानुसार पार्कसाईट पोलीस ठाण्याचे काही पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने ट्रीजा टेकेकरा यांनी चार श्वानांना परेल येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यातील तीन श्वानांचा मृत्यू झाला. एका श्वानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पार्कसाईट पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.