लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पती बाहेर फिरायला घेऊन जात नसल्याच्या रागातून महिलेने तिच्या तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी पतीने केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी मुलाच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आईचा शोध घेत आहेत.

घाटकोपरमधील नारायण नगर परिसरात गुडीयाबानो खान (२५) पती आणि तीन वर्षांच्या मुलासोबत वास्तव्यास आहे. या महिलेचा पती टॅक्सीचालक आहे. रविवारी सुट्टी असल्याने बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट गुडीयाबानोने पतीकडे धरला होता. मात्र त्याने फिरायला जाण्यास नकार दिला. त्यामुळे उभयतांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. त्यानंतर तो कामावर निघून गेला. मात्र पतीसोबत झालेल्या भांडणामुळे संतापलेल्या गुडीयाबानोने तिच्या तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला घरात एकट्याला सोडून ती निघून गेली.

मुलगा बराच वेळ घरात रडत असल्याने शेजाऱ्यांनी ही बाब फोन करून गुडीयाबानोच्या पतीला सांगितली. तो तत्काळ घरी पोहचला. यावेळी मुलगा गंभीर अवस्थेत रडत होता. त्याने तत्काळ त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याने याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुडीयाबानोविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against women who brutally beat three year old son mumbai print news mrj