मुंबई– विरार–दादर जलद लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ करणाऱ्या तरुणाविरोधात बोरीवली रेल्वे पोलिसांनी १३ दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ सप्टेंबर रोजी विरार-दादर लोकलमध्ये घडली होती. या कृत्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
११ सप्टेंबरला काय घडले?
विरारमध्ये राहणाऱ्या स्वरा भोसले या ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी अंधेरीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी विरार स्थानकातून संध्याकाळी ६ ची विरार- दादर लोकल पकडली. त्या ट्रेनच्या पहिल्या महिला डब्यात (चर्चगेट बाजूने) प्रवास करत होत्या. महिलांच्या डब्यात तुरळक गर्दी होती. मिरा रोड स्थानक गेल्यानंतर महिलांच्या डब्याशेजारी असलेल्या मालवाहू (लगेज) डब्यात चढलेल्या तरुणाने महिलांच्या डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. खिडकीजवळ बसलेल्या तीन तरुणी या प्रकाराने घाबरून दुसरीकडे जाऊन बसल्या. त्यानंतर त्या तरुणाने रागारागाने लोकलच्या डब्याच्या पत्रावर जोरजोराने बुक्के मारायला सुरुवात केली.या सर्व प्रकारामुळे महिलांच्या डब्यात भितीचे वातावरण पसरले होते.
घटनेचे चित्रिकरण प्रसारित
महिलांनी रेल्वे हेल्पलाईनलाही फोन केला. मात्र मदत मिळाली नाही. अंधेरी स्थानक येईपर्यंत हा प्रकार सुरू होता. महिलांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. त्या विकृत व्यक्तीने आम्हाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, गैरवर्तन केले. त्याने हात-पायाने डब्याचे दार आणि खिडकी ठोकून महिलांमध्ये भीती निर्माण केली. माझ्यासह इतर महिलांनीही मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास १५ मिनिटे कॉल लागत नव्हता. आम्ही अनेक महिला होतो. तरीसुद्धा डब्यात भीतीचे वातावरण होते. जर एखादी महिला एकटी प्रवास करत असती तर काहीही अनर्थ घडू शकला असता, असे स्वरा यांनी सांगितले.
कुठला गुन्हा दाखल ?
या घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी स्वरा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ (स्त्रीच्या शीलाचा अपमान करणारे किंवा तिच्या गोपनीयतेत घुसखोरी करणारे शब्द, कृती, हावभाव) तसेच रेल्वे कायद्यातील कलम १४५(ब) (रेल्वेच्या परिसरात त्रास देणे, अश्लील वर्तन करणे, किंवा शिवीगाळ करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सीसीटीव्ही चित्रण तपासत आहोत आणि लवकरच आरोपीला अटक करू, असे बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले.