मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यामुळे जमिनीखालील पाणी गळती शोधणे अवघड होणार आहे. काँक्रीटीकरण केलेले रस्ते कोणत्याही कारणासाठी पुन्हा खोदण्यास पालिका प्रशासनाने आधीच मनाई केली असली तरी गळती शोधण्यासाठी रस्ते खोदावेच लागणार आहेत. जमिनीखालील जीर्ण वाहिन्यांमुळे पाणी गळतीचे प्रमाणही मुंबईत मोठे आहे. त्यामुळे खड्डे मुक्त मुंबईसाठी महापालिकेने हाती घेतलेला कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प पाणी गळती शोधण्यासाठी मात्र मारक ठरणार आहे.

खड्डेमुक्त मुंबईची महत्त्वाकांक्षी घोषणा करीत मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात टप्प्याटप्प्याने रस्ते काँक्रीटीकरण केले जात आहे. मुंबईत एकूण सुमारे २००० किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी सुमारे एक हजार किमीपेक्षा अधिक लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या कामांचे कॉंक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे.

येत्या दोन वर्षात मुंबईतील सगळे रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा मुंबई महापालिका प्रशासनाला आहे. मात्र या कॉंक्रीटीकरण प्रकल्पामुळे मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईत पाणी गळतीचे प्रमाण खूप जास्त आहे. जमिनीच्या खालून जाणाऱ्या जलवाहिन्या या ब्रिटीशकालीन आहेत. त्यामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत. अनेकदा या जलवाहिन्यांमधून गळती होऊ लागते. गळती झाल्यास कित्येकदा ही गळती लक्षातच येत नाही. मात्र परिसरातील पाणी पुरवठ्याचा दाब कमी झाल्या की नागरिकांच्या तक्रारी येतात. तेव्हा गळतीचा शोध घेतला जातो. कधीकधी गळती होऊन रस्ता भुसभुशीत झाल्यामुळे रस्ता खचतो किंवा गळतीचे पाणी रस्त्यावर झिरपते. मात्र काँक्रीटीकरणामुळे गळती शोधणे अवघड होत चालले असल्याचे मत जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

चार हजाराहून अधिक तक्रारी

सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याखालील एखाद्या जलवाहिनीत गळती झाल्यास रस्त्याच्या एका बाजूला खड्डा करून मुख्य जलवाहिनीला छेद देऊन आत सीसीटीव्ही कॅमेरा सोडला जातो व त्या कॅमेराच्या सहाय्याने नक्की गळती कुठे आहे त्याचा शोध घेतला जातो. मग गळतीच्या ठिकाणी खड्डा घेऊन दुरुस्ती केली जाते, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या काळात गळतीच्या चार हजारांहून अधिक तक्रारी सोडवल्याची माहितीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.