मुंबई : ‘विदूषकांना मारायला उठलेला समाज हे आजचे भयानक वास्तव आहे. समाजाला विनोदनिर्मिती करणाऱ्यांकडून धोका नाही तर त्यांना मारणाऱ्यांकडून आहे. विनोदनिर्मिती करणारे हा धोका नाही. कारण आजारी विनोदी लेखक नसून मारायला उठलेला समाज आजारी आहे. त्यामुळे विनोदी लिखाणावर ‘सेन्सॉरशिप’ आहे,’ असे मत प्रसिद्ध विनोदी लेखक मंदार भारदे आणि सॅबी परेरा यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या चौथ्या दिवशी पार पडलेल्या ‘आजच्या काळातील विनोदी लेखन’ या चर्चासत्रात सॅबी परेरा आणि मंदार भारदे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

पुलंच्या काळात समाजाला सांस्कृतिक भूक होती. आता ती राहिली आहे का, हा प्रश्न आहे. मनाने प्रसन्न असू तरच विनोद समजून घेता येतो. आता असे दिसते की आपण एकूण जगण्यातला ‘रोमान्स’ विसरत चाललो आहोत. काहीतरी गंभीर आणि वाईट आपल्यात घडते आहे. त्यातून आपण सगळे गमावतोय. विनोद आणि आस्वादक वृत्तीही आपण गमावत चाललो आहोत, असे भारदे म्हणाले.

आताच्या काळात विनोदी लेखन करताना आपण जे पाहिले तेच लिहिताना कुणाच्या भावना दुखावल्या जातील याची धास्ती असते. टोकदार सुचलेला उपहास प्रत्यक्ष लेखणीतून तीव्रतेने उतरत नाही. त्यामुळे मी एक प्रकारची ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ पत्करली आहे, असे सॅबी परेरा म्हणाले. त्यामुळे विनोदाचे कान तयार करायला हवेत आणि स्वतःवर केलेला विनोद स्वीकारताही यायला हवा. माणूस जेव्हा विनोद करतो तेव्हा त्याला विसंगती दाखवायची असते. त्यामुळे विनोदासह सुंदर जगणे आपल्याला टिकवता यायला हवे, असेही ते पुढे म्हणाले.

लिहिताना भय वाटते

पु. ल. देशपांडे यांचे अर्ध्याहून अधिक साहित्य आताच्या महाराष्ट्राने जाळले असते. कारण त्यांनी इतिहास आणि पुराणांवर उपहासात्मक लिखाण केले होते. पण सध्याच्या काळात समाजाच्या भावना सतत दुखावल्या जातात. यामुळे विनोदी लेखन करताना कुठेतरी भय वाटते, असे मंदार भारदे म्हणाले.

विनोद अभिजात लेखन का नाही ?

महाराष्ट्रात विनोदी लेखनाला सव्वाशे वर्षांची परंपरा असूनही विनोदी लेखनाला अभिजात साहित्य मानले जात नाही. अनेक मान्यवर तुमचे विनोदी लेखन आवडते असे खासगीत सांगतात. मात्र जाहीरपणे सांगत नाहीत. तसेच उत्तम पुस्तकांची निवड करतानाही विनोदी साहित्य मागे पडते, अशी खंत सॅबी परेरा यांनी व्यक्त केली.

माध्यमे बदलतील पण विनोद राहील

स्टँडअप कॉमेडियन, समाजमाध्यमांवर विनोदी लेखन करणारे यांनी विनोदाला पुढल्या वरच्या पायरीवर नेऊन ठेवले आहे. प्रेक्षकांचाही प्रतिसाद वाढतो आहे. त्यामुळे विनोदासाठी प्रेक्षक वर्ग वाढतो ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विनोदनिर्मितीचे माध्यम बदलते आहे. सध्या ते मुद्रित आहे पुढे ते डिजिटल असेल. त्यामुळे माध्यमे बदलतील पण विनोद राहील, असे मत सॅबी परेरा आणि मंदार भारदे यांनी व्यक्त केले.