मुंबई : ‘‘शिवसेना हिंदूत्ववादी असेल, पण बाबरी मशीद पाडण्यात शिवसेना कार्यकर्त्यांचा हात नव्हता किंवा त्याचे नियोजन शिवसेना भवनमध्ये झाले नव्हते’’ या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली. पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला असून, हे भाजप-शिंदे यांना मान्य आहे का, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांनी सारवासारव केली.     

चंद्रकांत पाटील यांचे हे वैयक्तिक मत असल्याचा खुलासा भाजपला करावा लागला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. चोहोबाजूने टीकेचा भडीमार होऊ लागताच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा करीत चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदरच असल्याचे स्पष्ट केले. या वादात पाटील हे एकाकी पडल्याचे चित्र दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला. ‘‘बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा हात नव्हता वा त्याचे नियोजन शिवसेना भवनात झाले नव्हते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने चळवळ उभारली होती. रा. स्व. संघाचा त्याला पाठिंबा होता. या साऱ्या घडामोडींच्या वेळी माझ्याकडे अयोध्येची जबाबदारी होती.

शिवसेना कुठेच नव्हती’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटील यांच्या विधानाच्या आधारे शिंदे आणि भाजपची कोंडी केली. ‘‘बाबरी मशीद पाडण्यात आल्यावर या कृतीची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नव्हते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या शिवसेना कार्यकर्त्यांनी हे काम केले असेल, तर त्याचा मला अभिमान आहे’’, अशी भूमिका घेतली होती. मात्र, पाटील यांच्या वक्तव्यामुळे बाळासाहेबांचा अवमान झाला आहे’’, असा आरोप करून उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘‘बाबरी मशीद पाडली तेव्हा हे सगळे ‘उंदीर’ बिळात लपले होते. भाजपने कोणतेही शौर्य दाखविले नाही. त्यानंतर झालेल्या दंगलीत शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर लढले. त्यावेळी सत्ता नव्हती, तरीही आम्ही मुंबई वाचवली. त्यावेळी पंतप्रधानांचे नावही नव्हते’’, असे ठाकरे म्हणाले. ‘‘शिंदेंनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये आणि छायाचित्रही वापरू नये’’, असा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. ‘‘मी अयोध्येला शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. रामजन्मभूमीचा कायदा करा, अशी आमची मागणी होती, पण पंतप्रधानांची हिंमत झाली नव्हती. न्यायालयाने निकाल दिल्यावर राममंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे’’ याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. ‘‘सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जातात, भाजप आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे’’ असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून उद्धव ठाकरे यांनी वातावरण तापविल्याने शिंदे गट तसेच भाजपची कोंडी झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांची भूमिका वैयक्तिक असून, ही भाजपची भूमिका नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या मताशी मुख्यमंत्री शिंदे वा शिवसेना सहमत नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

स्वपक्षाने एकाकी पाडल्याने तसेच स्वत: शिंदे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केल्यावर चंद्रकांत पाटील यांना सारवासारव करावी लागली. ‘‘रामजन्मभूमी आंदोलनात प्रत्येक व्यक्ती हिंदू म्हणून सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आंदोलनास पाठिंबा होता आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आपल्या संघटनांचे नाव न घेता हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. माझ्या वक्तव्यातून झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करणार आहे’’, असे पाटील म्हणाले.

‘‘बाळासाहेबांचा अनादर होईल, असे माझ्या तोंडून काहीच निघणार नाही. मुलाखतीत मी बाळासाहेबांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेऊन सांगा, की बाळासाहेबांबद्दल अनादर नाही, म्हणून हा खुलासा करत आहे’’ असे पाटील म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांची भूमिका महत्त्वाची : बावनकुळे

रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेच्या सहभागाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मांडलेली भूमिका ही वैयक्तिक आहे. ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. रामजन्मभूमी आंदोलनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन होते. त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पाटील यांची आधीची वादग्रस्त विधाने..

* कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या. सरकारकडे अनुदान मागितले नाही.

* मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी स्वीकारले.

बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, उमा भारती हे पक्ष म्हणून नव्हे, तर रामभक्त म्हणून बाबरीविरोधात उभे राहिले. सावरकर असो की हिंदूत्ववाद, बाळासाहेबांनी नेहमी देशहिताची भूमिका घेतली.  -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री