मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांना गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपी चेतन सिंह बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अटकेत आहे. सोमवारी बोरिवली न्यायालयाने चेतन सिंहच्या पोलीस कोठडीत वाढ करून ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै रोजी तीन मुस्लिम प्रवासी आणि एका आरपीएफ अधिकाऱ्याला आरोपी चेतन सिंहने गोळीबार करून मारले. त्यानंतर त्याने एक्स्प्रेसमधून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला अटक केली होती.
न्यायालयाने यावेळी ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र यात चेतन सिंहने आजारपणाचे कारण देत पोलीस तपासाला सहकार्य केले नाही. तसेच चौकशी करतेवेळी शांत बसतो किंवा अचानकपणे अस्पष्ट संभाषण करतो. त्यामुळे ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने अधिक तपास करता येणे शक्य होणार आहे. सोमवारी चेतन सिंह याची आई आणि पत्नी यांची रेल्वे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया लोहमार्ग पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी दिली.