मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी यंदा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख नियोजन करण्यात यावे. वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारीमार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा. वारीमार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील. पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्या. वैद्यकीय पथके, त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार वारी

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपूरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्टय़पूर्ण अशा वारीचे दर्शन घडवा, त्यासाठी उत्तम नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde order for proper planning for warkaras for ashadhi vari amy