मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सरकार सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा पाढा वाचत हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही, अशा शब्दांत विरोधकांना टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दीपक केसरकर यांनीही महाविकास आघाडीला टोले लगावण्याची संधी साधली.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी तितुका मेळवावा- विश्व मराठी संमेलन २०२३’ला बुधवारपासून सुरुवात झाली. वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एनएससीआय डोम येथे ६ जानेवारीपर्यंत रंगणार असलेल्या या संमेलनाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या निमित्ताने प्रास्ताविक करताना मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनीही महाविकास आघाडीला टोले लगावण्याची संधी साधली. ‘आपल्याविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठविणाऱ्या सरकारची मुदत संपलेली आहे. आता महाराष्ट्रात असे सरकार आले आहे की तुम्ही काहीही बोललात, तर त्याकडे आम्ही हसून दुर्लक्ष करू आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करू’, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले, तर या विश्व मराठी संमेलनावरूनही काहीजण तुमची उणीदुणी काढतील, असे सांगत भविष्यात या संमेलनाचा निश्चित वटवृक्ष होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरकरांना दिले.
कोणत्याही संमेलनाच्या आयोजनासाठी लागणारी तळमळ केसरकर यांच्यात आहे, हळूवारपणे आपले मुद्दे मांडण्याच्या त्यांच्या कलेचा उपयोग आपल्याला ‘जून’ महिन्यात कसा झाला हे सांगताना पुन्हा सत्तांतरनाटय़ाच्या आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर भाष्य..
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाला. महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षांचा राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात तब्बल १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. आजही कित्येक मराठी भाषिकांना महाराष्ट्रात यायचे आहे, अशा सर्व लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थितांमधील काही जणांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा सुद्धा दिल्या.