आम्हाला कुठलीही गोष्ट आयती मिळालेली नाही. ज्यांना सगळं आयतं मिळालं त्यांनी आम्हाला आव्हानं देत बसू नये. इकडून उभं राहा, तिकडून उभं राहा अशी छोटी मोठी आव्हानं मी स्वीकारत नसतो. सहा महिन्यांपूर्वी जे केलं तसं मोठ्ठं आव्हान मी स्वीकारत असतो. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार आहेत. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी आहेत. जे आम्हाला आव्हानं देत आहेत त्यांना सगळं आयतं मिळालं आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरळीत आज माझा जो सन्मान करण्यात आला, आमचा सन्मान करण्यात आला त्याबाबत मी सगळ्यांचेच आभार मानतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतल्या त्यांच्या भाषणाला सुरूवात केली. आज गेले सहा महिने सरकारला झाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने मुंबईतल्या भूमिपुत्रांच्या वतीने झालेला सत्कार होतो आहे याचा आनंद सर्वात जास्त झाला आहे. खरं म्हणजे मुंबईचं वैभव म्हणजे कोळीवाडे आहेत. इथला भूमिपुत्र हा मुंबईकर आहे. कोळी समाज हा शांत, प्रेमळ आणि जिवाला जीव देणारा आणि दर्याचा राजा म्हणून ओळखला जातो. समुद्राच्या वादळात उंच लाटांशी सामना करणारा माझा कोळी बांधव आहे.

आपण पाहतो अनेक वादळं येतात. पण कोळी बांधव जिवाची पर्वा न करता खोल समुद्रात आपला उदरनिर्वाह, कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मासेमारी करत असतो. कोळी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहतो आहे. मलाही या कोळी बांधवांबाबत एक वेगळा जिव्हाळा आहे. मी कोळी नसलो तरीही माझं आपल्या व्यवसायाशी जवळचं नातं आहे. माझी जेव्हा सुरूवात झाली तेव्हा अनेक फिशरीज कंपन्यांमध्ये मी व्यवसाय करत होतो. त्यावेळी भाऊच्या धक्क्यावर मी येत होतो. मी या व्यवसायाकडे जवळून पाहिलं आहे. कोळी बांधवांच्या सुख-दुःखात मी समरस होत आलो आहे. आज आपण पाहतो आहे की कोळी बांधव भगिनी आपलं जी परंपरा आहे, कोळी नृत्य आहे ते टिकवून ठेवत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान आले होते तेव्हाही कोळी बांधव-भगिनींनी त्यांचं स्वागत केलं होतं. बराक ओबामा आले होते त्यांचंही स्वागत कोळी बांधवांनी केलं होतं. कोळी बांधव हा सगळ्यांना हवेहवेसे वाटतात.

दीड वर्षापूर्वी आपण आंदोलन केलं. कोस्टल रोडला तुम्ही विरोध केला नाही पण दोन पिलरमधलं अंतर वाढवण्याची मागणीच तुम्ही केली होती. त्यावेळी सत्तेची हवा डोक्यात गेलेले लोक होते. त्यांनी तुमची मागणी फेटाळली. मात्र आपलं सरकार आलं मला आठवतंय किरण पावसकर आणि इतर सगळे लोक माझ्याकडे आले. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक घेतली आणि आपली रास्त मागणी आहे त्या मागणीला आम्ही होकार दिला. आम्ही सूचना दिल्या की १२० मीटरचं अंतर झालं पाहिजे आम्ही सकारात्मक निर्णय घेतलं. पण तुमच्यातलं आणि आमच्यातलं अंतर कमी झालं हे पण मी सांगायला आलो आहे.

आम्हीही तुमच्यासारखाच संघर्ष करून इथपर्यंत पोहचलो आहोत. आम्हाला कोळी बांधव महत्वाचे आहेत. कारण मुंबईचे पिलर माझे कोळी बांधव आहेत. सरकार कुणासाठी असतं? नियम कुणासाठी असतात? तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठीच असतं ना? आमच्या सरकारने सहा महिन्यात धोरणात्मक निर्णय घेतले. पहिल्या दिवसापासून आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. धाडसी निर्णय घेणारं हे सरकार आहे.

तुमचं आणि आमचं जे नातं आहे ते वेगळंच नातं आहे. कोळी वाड्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. आपली खाद्यसंस्कृती आहे. कोळी बांधव आणि भगिनींच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणारच. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही. काही लोक काहीबाही बोलत असतात. मुंबईच्या निवडणुका आल्या की मुंबई तोडणार, मुंबई केंद्रशासित करणार, मुंबईचे तुकडे पाडणार असले जावईशोध सुरू करतात. मुंबई कधीही कुणाच्या हाती जाऊ देणार नाही. आम्ही जे घालवायचं होतं ते सहा महिन्यांपूर्वी घालवलं आहे. आम्हाला जे मिळालं ते मेहनतीने मिळालं आहे आम्हाला काहीही आयतं मिळालेलं नाही. ज्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्या ते आम्हाला आव्हानं देत आहेत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे. तसंच आम्हाला जे आव्हानं देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही. सहा महिन्यांपूर्वी घेतली तशी मोठी आव्हानं स्वीकारतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde reply to aditya thackeray from worli he said we did not get any thing ready scj
First published on: 07-02-2023 at 22:08 IST