मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत धक्का लागल्याने दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. या घटनेमध्ये एका कार्यकर्त्यावर कात्रीने वार करण्यात आले असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबईकरांची पाणी चिंता मिटली; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९९.३३ टक्के पाणीसाठा

मुलुंडच्या खिंडीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती गुरुवारी रात्री विसर्जनासाठी तलावाच्या दिशेने जात होता. या गणपतीची मिरवणूक अमर नगर परिसरात आली. याचवेळी परिसरातील एकवीरा मित्र मंडळाच्या गणपतीची मिरवणूक देखील या ठिकाणी आली. यावेळी नाचताना गणेश खंदारे या तरुणाचा धक्का एकवीरा मित्र मंडळाच्या वादन पथकातील अक्षयला लागला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र याचदरम्यान अक्षय आणि त्याचा सहकारी दीपकने गणेशला मारहाण केली. त्यानंतर यातील एकाने कात्रीने गणेशवर वार केले. गंभीर जखमी गणेशला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलुंड पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून अक्षय आणि दीपकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between two group workers during ganesh immersion procession in mulund mumbai print news zws