राज्यात सत्तासंघर्ष कायम असल्याने तिढा सोडविण्याच्या दृष्टीने सोमवारी नवी दिल्ली राजकीय हालचालींचे केंद्र ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, राजधानीतील दिवसभराच्या राजकीय भेटीगाठींनंतरही सत्तास्थापनेबाबतची कोंडी फुटलेली नाही.
शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. निकालानंतर ११ दिवसांनंतरही काहीच तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या ६, कृष्ण मेनन निवासस्थानी भेट घेतली. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून भेट घेतल्याचा दावा फडणवीस यांनी केला. परंतु, या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेबाबत तोडगा कसा काढावा, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. नंतर मुख्यमंत्र्यांनी भाजपचे राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री राजधानीतच होते.
भाजपच्या पातळीवर तोडग्याचे प्रयत्न सुरू असतानाच शरद पवार यांनी सायंकाळी १०, जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, याबाबत चाचपणी सुरू आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तशी परवानगी सोनिया गांधी यांच्याकडे मागितली असता अनुकूल प्रतिसाद मिळाला नव्हता. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.
सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आमच्याकडे पुरेशी सदस्यसंख्या नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काही प्रस्ताव आल्यास विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी मुंबईत जाऊन सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सोनिया गांधी यांची पुन्हा दोन दिवसांत भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार यांनी सोनिया यांना सर्व पर्यायांची कल्पना दिली. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापण्याबाबत मतैक्य न झाल्यास काँग्रेसने पाठिंबा देण्याबाबत अनुकूल भूमिका घ्यावी, असा प्रस्ताव मांडल्याचेही समजते. सर्व बाबींचा विचार करून मगच काँग्रेस निर्णय घेण्यात येईल, असे सोनिया यांनी पवारांकडे स्पष्ट केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्टोनी यांच्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दिल्लीत राजकीय घडामोडी सुरू असतानाच, मुंबईत शिवसेनेचे संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे. शिवसेना कोणताही अडथळा आणणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे राऊत यांनी सांगितले.
दिवसभर विविध पातळ्यांवर सरकार स्थापण्यासाठी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्याला यश आले नव्हते.
समान मंत्रिपदे देण्याची भाजपची तयारी?
सत्तास्थापनेबाबतची कोंडी फुटावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्रीपद दिले जाणार नसले तरी समान मंत्रिपदे व काही महत्त्वाची खाती सेनेला देण्याचा विचार भाजपकडून सुरू असल्याचे समजते. महसूल, वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम यापैकी महत्त्वाची खाती आणि मंत्र्यांची संख्या वाढवून मिळाल्यास शिवसेनेलाही आमचा विजय झाला, हे दाखविण्याची संधी मिळू शकते. दिल्लीत या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, पुणे दौरा रद्द करत फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीतच थांबले आहेत.
