नेतृत्वाकडून डावलल्याने जयदत्त क्षीरसागर नाराज | Loksatta

नेतृत्वाकडून डावलल्याने जयदत्त क्षीरसागर नाराज

अलीकडेच अजितदादा बीडच्या दौऱ्यावर आले असता जयदत्तअण्णांनी पाठ फिरविली होती.

नेतृत्वाकडून डावलल्याने जयदत्त क्षीरसागर नाराज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांशी निवासस्थानी चर्चा; पक्षांतराची शक्यता फेटाळली

बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणात धनंजय मुंडे यांना मिळणारे वाढते महत्त्व, पुतण्याला आपल्याच विरुद्ध पक्षाच्या नेत्यांनी चिथविल्याने नाराज असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्यमंत्र्यांना आपल्या निवासस्थानी चहापानाला निमंत्रित करून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला शुक्रवारी सूचक इशारा दिला आहे.

एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन हे मंत्री बीडच्या दौऱ्यावर होते. मुंबईहून बीडच्या प्रवासातच मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना बरोबर घेतले. तसेच बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर जवळच असलेल्या क्षीरसागर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री चहापानाला गेले. भाजप सरकारच्या विरोधात यवतमाळमध्ये राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरू केले असतानाच पक्षाच्या माजी मंत्र्याच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी जाणे यातून वेगळी चर्चा सूरू झाली. बीडच्या राजकारणात क्षीरसागर यांचे प्रस्थ आहे. पण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जयदत्तअण्णा नाराज होणे स्वाभाविकच होते.

भाजपमधून आलेल्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने ताकद दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच बीडच्या राजकारणात मुंडे यांना मुक्तवाव दिला. त्यातून जयदत्तअण्णा क्षीरसागर नाराज झाले होते. हे कमी की काय, जयदत्तअण्णांच्या पुतण्यालाच राष्ट्रवादीने काकांच्या विरोधात फितविले. त्यातून क्षीरसागर काका-पुतण्यात स्पर्धा सुरू झाली. अजितदादांच्या या राजकारणामुळेच अलीकडेच अजितदादा बीडच्या दौऱ्यावर आले असता जयदत्तअण्णांनी पाठ फिरविली होती.

बीड राजकारणात धनंजय मुंडे यांनी जयदत्तअणांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला. माजी मंत्री असतानाही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलण्यात येऊ लागले. धनंजय मुंडे यांच्या एकूणच राजकारणाबद्दल जयदत्तअण्णांनी मागे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सारे कानावर घातले होते. क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयांचे पत्ते कापण्यात आले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या चुलत भावंडांमधून विस्तवही जात नाही. धनंजय यांची पावले ओळखून जयदत्तअण्णा आणि पंकजा यांनी जुळवून घेतले. पंकजा मुंडे यांच्याशी जयदत्तअण्णांची जवळीक असल्यानेच धनंजय मुंडे यांनी जयदत्तअण्णांना राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न केला.

बीड जिल्ह्य़ात जयदत्तअण्णा यांच्या मातोश्री केशरकाकू क्षीरसागर यांचे वर्चस्व होते. काकू बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्याच वेळी बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा उदय झाला. काकू आणि मुंडे यांच्यात एवढी तेढ नव्हती.

पुढील निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. जयदत्त क्षीरसागर आणि विनायक मेटे यांचे अजिबात जमत नाही. यामुळेच बीड दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी मेटे यांना दूर ठेवल्याची चर्चा आहे.

यात राजकारण काहीही नाही – जयदत्त क्षीरसागर

मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे यांनी निवासस्थानी भेट दिल्याने जयदत्तअण्णा हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. पण या चर्चेचा जयदत्तअण्णांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट शब्दांत इन्कार केला. जिल्ह्य़ातील प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार होते. त्यांनीच मला बरोबर येण्याची सूचना केली. हेलिपॅड हे माझ्या निवासस्थानाच्या जवळच होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी चहापानाला माझ्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. त्यात राजकारणार काहीही नाही. गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी एकत्र प्रवास केला. म्हणून वेगळी चर्चा करायची का, असा सवालही क्षीरसागर यांनी केला. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार या वावडय़ा आहेत. त्यात तथ्य काहीही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपने यश मिळवले. त्यानिमित्त पक्षाच्या लखनौ येथील कार्यालयात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष महेंद्र पांडे यांनी आनंद व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2017 at 01:49 IST
Next Story
मुंबईतील तरुणाची बदलापूरमध्ये हत्या?