‘मुंबई आमचीच’ असे दावे करणाऱ्या भाजप-शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार आणि मंत्री मुंबईकरांच्या मदतीसाठी पावसात रस्त्यांवर उतरलेच नाहीत. अनेक नेत्यांचा मुंबईकरांना ट्विटरवर फुटकळ आवाहने, खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बाइट्स देण्यावर भर होता. मोजक्या काही आमदारांनी, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मदतीचा किरकोळ हात दिला. निवडणुकांमध्ये आश्वासने देणारे राजकीय नेते गेले कुठे, असा प्रश्न अनेक विभागांमध्ये नागरिकांना पडला आहे. मात्र त्या तुलनेत स्वयंसेवी संस्था, चर्च व स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्यांचा हजारो जणांचा हातभार मोठा होता.
मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर मोठा असल्याने रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीतच होती आणि दुपारनंतर ती ठप्पच झाली. हजारो मुंबईकर वाहनांमध्ये, रेल्वेमार्गावर आणि स्थानकांवर अडकून पडले. रेल्वेमार्गावरून शेकडो प्रवासी चालत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय व महापालिका नियंत्रण कक्षातून माहिती घेऊन मुंबईकरांना खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून व ट्विटरवरून आवाहन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी महापालिका नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली होती. मात्र वांद्रे, दादर परिसरात पाणी साचल्याने ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानातून बाहेरच पडले नाहीत. शिवसेना व भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांनी किरकोळ मदत करण्यापलीकडे फारसे काही केले नाही. मुंबई भाजप अध्यक्ष अॅड्. आशीष शेलार यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी यांना मुंबईकरांच्या मदतीसाठी जाण्याच्या सूचना सकाळीच दिल्या व त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनाही नागरिकांच्या मदतीसाठी पाठविले. वांद्रे, खार जिमखाना, सांताक्रूझ, गजधर बांध परिसरात जाऊन पाणी साचलेल्या परिसरातील लोकांची राहण्याची पर्यायी व्यवस्था करणे, अन्य मदत पुरविणे, झाडे पडल्याच्या ठिकाणी रस्त्यांवरचे अडथळे दूर करणे आदी स्वरूपाची मदत केल्याची माहिती शेलार यांनी दिली.
या परिसरातील काही नगरसेवकही त्यांच्यासमवेत होते. आमदार अमित साटम, पराग अळवणी, योगेश सागर, राज पुरोहित मनीषा चौधरी यांनीही आपल्या परिसरात मदतकार्य केले. खासदार किरीट सोमय्या हे दुपारी मुलुंड रेल्वेस्थानकावर व अन्य परिसरात गेले, मात्र ‘भारत जोडो’ अभियान सुरू केलेल्या अखिल भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन या मतदारसंघात किंवा अन्य विभागांमध्ये फिरकल्याही नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील कुर्ला, सांताक्रूझ, वांद्रे परिसरात नागरिकांचे बरेच हाल झाले, पाणी तुंबले, प्रचंड वाहतूक कोंडी झाली, झाडे पडली. मात्र त्यांनी नागरिकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी केवळ ट्विटरवरून फुटकळ आवाहने केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी अडकून पडलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली. नगरसेवक अतुल शहा, मुंबई भाजयुमो अध्यक्ष मोहित कुंभोज, मनोज कोटक, हेतल गाला आदींनी आपल्या विभागात नागरिकांना मदतीचा हात दिला. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या मदतीला जाण्याच्या सूचना देऊनही भाजपचे मंत्री, आमदार, खासदार रस्त्यावर उतरल्याचे चित्र नव्हते. शिवसेनेबाबतही हेच चित्र होते. विभागप्रमुख, शाखाप्रमुख आपल्या विभागात काही प्रमाणात मदत करीत होते. मात्र शिवसेनेचे आमदार, खासदारही रस्त्यावर उतरले नव्हते. खासदार अरविंद सावंत कोकणात गणपतीला गेले असून मी पावसात अडकलेल्या २५-३० लोकांची राहण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. सेनेचे अनेक नेते गणेशोत्सवासाठी बाहेरगावी असून काहींनी तुलनेने सक्रिय सहभाग घेतला नसल्याचे दिसून आले. काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यासह अन्य नेत्यांनीही मदतकार्य केल्याचे दिसून आले नाही.
