गेले चार महिने दक्षिण मुंबईत फणसवाडी, कोळीवाडी परिसरात होत असलेल्या मलयुक्त पाणीपुरवठय़ाची दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना तातडीने हा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. त्यामुळे तातडीने खड्डे खोदून दूषित पाण्याच्या स्रोताची शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शिवसेनेच्या विभागप्रमुखांपासून शाखाप्रमुखांची फौज मंगळवारी सकाळपासूनच पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी धावपळ करीत होती.
पालिकेच्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीतील या परिसरात हा मलयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याशी संपर्क साधून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्याची सूचना केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अजय मेहता यांच्याशी संपर्क साधला. तसेच दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, स्थानिक नगरसेवक संपत ठाकूर आणि अन्य पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आपण पालिका अधिकाऱ्यांकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करीत होतो, असे ठाकूर यांचे म्हणणे आहे.
आयुक्तांच्या आदेशानंतर पाणी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज दाखल झाली आणि काम सुरू झाले. जलवाहिनीत दूषित पाणी नेमके कसे मिसळत आहे, याचा शोध लागत नसल्याचे उत्तर देणारे सी विभागाचे अधिकारीही धावपळ करीत होते.
गेले चार महिने कोणतीही ठोस उपाययोजना न करणाऱ्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.