मुंबई : विनोदी अभिनेते असरानी यांना तत्कालीन हिंदी चित्रपटांंच्या पठडीप्रमाणे नायकाचा मित्र वा भाऊ अशा अनेक भूमिका मिळाल्या. त्यातही विशेषत: सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी त्यांची गट्टी जमली. ‘बावर्ची’, ‘नमक हराम’, ‘घर परिचय’ अशा राजेश खन्नांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांचे स्थान पक्के झाले. १९७२ ते १९९१ या काळात असरानी यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर २५ चित्रपट केले. त्यांच्यासारख्या अनुभवी आणि हुशार अभिनेत्याच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाच्या काळाचा साक्षीदार आणि विनोदाचा हुकूमी एक्का हरपल्याची भावना व्य़क्त होत आहे.
असरानी यांनी केलेल्या विनोदी वा चरित्र भूमिका लक्षवेधी ठरल्या. दरम्यानच्या काळात विनोदी चित्रपटांचा जोर ओसरला. मात्र डेव्हिड धवन, प्रियदर्शन यांच्यासारख्या दिग्दर्शकांमुळे जेव्हा विनोदी चित्रपटांना संजीवनी मिळाली, त्या काळात असरानी यांनी पुन्हा चित्रपटांतून आपले स्थान पक्के केले. त्यामुळे ‘घरवाली बाहरवाली’, ‘हेराफेरी’, ‘गरम मसाला’, ‘चूप चूपके’, ‘भुल भुलैय्या’, ‘दे दना दन’, ‘धमाल’ अशा कैक विनोदी चित्रपटातून असरानी यांनी काम केले. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नॉन स्टॉप धमाल’ आणि ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असरानी यांनी पहिल्यांदा गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर ‘चला मुरारी हिरो बनने’, ‘दिल ही तो है’, ‘उडान’ हे हिंदी चित्रपटही दिग्दर्शित केले.
‘शोले’तील संवादाची मोहिनी
मध्यंतरी ‘शोले’च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने बोलताना असरानी यांनी गेल्या कित्येक वर्षात असा एकही सोहळा वा कार्यक्रम नसेल जिथे हा संवाद म्हणून दाखवायची मागणी झाली नाही, अशी आठवण सांगितली. अर्थात याचे श्रेय पूर्णत: दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
विक्रमाची नोंद
– अभिनेते असरानी सत्तर ते ऐंशीच्या दशकात हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, बी. आर. चोप्रा अशा नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले. अगदी गुलजार यांच्याही बव्हंशी चित्रपटात असरानींचे स्थान पक्के असायचे.
– आसरानी यांच्या कामाचा झपाटा इतका अधिक होता, की सत्तर ते ऐंशीच्या दशकांत नायकांची पिढी बदलत गेली तरी असरानींचे चित्रपटातील स्थान आणि त्यांच्या भूमिका दोन्हीला धक्का लागला नाही. त्यामुळेच सत्तरच्या दशकांत असरानी यांनी जवळपास १०१ चित्रपटातून तर ऐंशीच्या दशकांत १०७ चित्रपटांतून भूमिका करत एक नवाच विक्रम नोंदवला.