वाणिज्य शाखेकडेच विद्यार्थ्यांचा अधिक कल
प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दक्षिण मुंबईतील जयहिंद महाविद्यालयाला मिळाली असतानाच, अकरावी प्रवेशाकरिता मात्र पश्चिम उपनगरातील विलेपाल्र्याच्या मिठीबाई महाविद्यालयाकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे दिसून आले. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरताना तब्बल ३८,८९५ विद्यार्थ्यांनी मिठीबाई महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला पहिली पसंती दिल्याचे दिसून येते. त्याच वेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे जाण्यात असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.
वाणिज्य शाखेसाठी मिठीबाईखालोखाल माटुंग्याचे आर. ए. पोदार, भवन्स, साठय़े, रुपारेल, सोमय्या, एनएम, रिझवी आणि त्यानंतर जयहिंद या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी अग्रक्रमाने पसंती दिली आहे, तर विज्ञान शाखेसाठी माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. अर्थात विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली म्हणून त्या महाविद्यालयांचा पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीचा कटऑफ जास्त आहे तर असेही नाही. उदाहरणार्थ वाणिज्यची मिठीबाई आणि पोदारची पहिल्या फेरीची कटऑफ ९१.८ टक्के होती, तर मिठीबाईपेक्षा तुलनेत कमी अर्ज (२७,६६७) आलेल्या एचआर महाविद्यालयाची कटऑफ ९३.४ टक्के इतकी होती. संबंधित महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या जागांवर कटऑफ ठरते. परंतु, ‘महाविद्यालय नेमके कुठे आहे त्यावरही त्याला असलेली मागणी प्रामुख्याने ठरते. उदाहरणार्थ दक्षिण मुंबईत महाविद्यालये खूप आहेत. तुलनेत उपनगरात कमी आहेत. पण उपनगरात विद्यार्थी संख्या अधिक असल्याने तेथील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता अधिक चढाओढ दिसून येते. दुसरे म्हणजे व्यवहार्यता व हुशारी दाखवून विद्यार्थ्यांनी भरलेले जागांचे पसंतीक्रम हेदेखील त्या मागील एक कारण असावे,’ अशी शक्यता अकरावीकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी व्यक्त केली.
पसंतीक्रमाची व्यवहार्यता
विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमाशी संबंधित महाविद्यालयांच्या गेल्या वर्षीच्या कटऑफची सांगड घातली जाते. ऑनलाइन पसंतीक्रम भरत असतानाच विद्यार्थ्यांना प्रत्येक पर्यायागणिक याची जाणीव करून देणारे संदेश ‘पॉप अप’ होत असतात. त्याची दखल घेत विद्यार्थ्यांनी हुशारीने पसंतीक्रम भरला की त्याचा प्रवेशाचा मार्ग सोपा होतो. नेमके हेच कारण काही ठरावीक महाविद्यालयांची अर्जाची संख्या वाढवणारेही ठरते. कारण ७० ते ९० टक्केवारीच्या आसपास मोठय़ा संख्येने विद्यार्थी असतात. त्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक गुण असलेले विद्यार्थी कमी असतात. कटऑफ ९० टक्क्यांच्या आसपासच बंद होत असेल तर या गुणांच्या दरम्यान असलेले विद्यार्थी त्या महाविद्यालयांचे पर्याय भरणे टाळतात. म्हणून कटऑफ अधिक असलेल्या महाविद्यालयांमधील प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या जास्त असेलच असे नाही.
प्रवेशाचे गणित
- अकरावी ऑनलाइन प्रवेशाकरिता मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई या मुंबई महानगर प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांतून यंदा २.२२ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
- या विद्यार्थ्यांकरिता २.६९ लाख जागा उपलब्ध आहेत, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल ४८ हजार जागा अधिक आहेत.
- आतापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये १५,६५२ विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार जागेचे वाटप झाले आहे.
- आता ११ जुलैला तिसरी प्रवेश फेरी जाहीर करण्यात येणार आहे.