मुंबई : संगीतातील प्रत्येक वाद्याला स्वत:ची अशी ओळख आणि स्वभाव आहे. मात्र जेव्हा कलाकार विविध वाद्यांचे सादरीकरण एकाच मंचावरून करतात, तेव्हा एक ताल, नाद, स्वर यांची अनोखी सांगीतिक अनुभूती रसिकांना अनुभवायला मिळते. सतार, बासरी, संतूर, तबला आणि पखवाज अशी पाच वाद्यो आणि या प्रत्येक वादनात आपल्या गुरूंनी निर्माण केलेल्या भव्य परंपरेचा वारसा पुढे नेणारे पाच दमदार शागीर्द कलाकारांचे वादन अशी अनोखी सांगीतिक पर्वणी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर मिळणार आहे.
मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमातंर्गत अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. येत्या ३० ऑक्टोबरपासून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पार्ल्यातील लोकमान्य सेवासंघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संगीतात गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व आजही (पान ५ वर) (पान १ वरून) अबाधित आहे. गुरूकडून शिक्षण घ्यायचे आणि आपला अभ्यास, रियाज प्रयत्नाने नवे काही निर्माण करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची हे तरुण कलाकारांकडून आजही त्याच निष्ठेने केले जाते. अशाच संगीत क्षेत्रातील पाच प्रतिभावंत वादकांची सांगीतिक मैफल असलेला ‘शागीर्द’ हा खास प्रयोग ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये सादर होणार आहे.
या कार्यक्रमात सितार वादक स्वीकार कट्टी, बासरीवादक हृषीकेश मजूमदार, संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी, पखवाजवादक गणेश सावंत आणि तबलावादक रोहित देव असे पाच तरुण वादक सहभागी होणार आहेत. या पाचही कलाकारांना सांगीतिक वारसा लाभलेला असला, तरीही संगीत क्षेत्रात त्यांनी आपला असा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. तबलावादक रोहित देव यांनी प्रसिद्ध तबलावादक आणि वडील पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून १६ वर्षे तबल्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी पंडित बिरजू महाराज, पंडित सतीश व्यास, पंडित रोणू मजुमदार यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांना साथसंगत केली आहे.
उस्ताद तौफिक कुरेशी यांच्यासारख्या मान्यवर कलाकारांबरोबर कार्यक्रम करणाऱ्या इटावा घराण्याच्या परंपरेतील सितारवादक स्वीकार कट्टी यांनीही त्यांचे वडील डॉ. सुनील कट्टी यांच्याकडून सितार वादनाचे प्रशिक्षण घेतले. बासरीवादक हृषीकेश मजूमदार यांनीही त्यांचे वडील प्रसिद्ध बासरीवादक रोणू मजुमदार यांच्याकडून वयाच्या सहाव्या वर्षापासून बासरी वादनाचे धडे गिरवले आहेत. संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांनी पंडित उमाकांत आणि पंडित रमाकांत गुंडेचा यांच्याकडून धृपद शैलीतील वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे, तर अल्पावधीत पखवाजवादक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या गणेश सावंत यांनी पंडित भवानी शंकर, पंडित सुरेश तलवलकर, पंडित मृणाल उपाध्याय आणि ज्ञानेश्वर सावंत अशा मातब्बर गुरूंकडून पखवाज वादनाचे शिक्षण घेतले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावरील या तरुण वादक कलाकारांची एकत्र संगीत मैफल कधी आणि कुठे पाहायला मिळणार याची माहिती लवकरच ‘लोकसत्ता’मधून प्रकाशित होईल.
(गणेश सावंत, स्वीकार कट्टी, रोहित देव, सत्येंद्रसिंह सोलंकी, हृषीकेश मजुमदार)
