मुंबई : प्रतिकूल परिस्थितीतही गतवेळच्या तुलनेत दोन जागा जास्त निवडून आल्याने काँग्रेस नेते समाधान व्यक्त करीत असले, तरी कधी एके काळी काँग्रेसला साथ देणाऱ्या कोकणातील पाच जिल्ह्य़ांमध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्य़ांमध्ये विधानसभेच्या एकूण ३९ जागा आहेत.

या पाचही जिल्ह्य़ांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. काँग्रेससाठी ही चिंताजनक बाब आहे. १९९० पर्यंत कोकणात काँग्रेसचा वरचष्मा होता. आधी समाजवादी आणि जनसंघाचे काँग्रेसला आव्हान असायचे. १९९० नंतर कोकणात शिवसेनेने डोके वर काढले. तेव्हापासून शिवसेनेचेच प्राबल्य राहिले. काँग्रेसची तेव्हापासून पीछेहाट सुरू झाली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला कोकणात फटका बसला. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर काही काळ काँग्रेसला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये यश मिळाले होते; पण आता तर काँग्रेस पक्ष नामशेष झाला आहे.

कोकणात सर्वाधिक १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेस पक्ष गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ गलितगात्र झाला; पण काँग्रेस नेत्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. ठाणे महापालिकेत जेमतेम तीन नगरसेवक निवडून आले होते. पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्य़ात पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते; पण आता पालघर जिल्ह्य़ात काँग्रेसची अनामत रक्कमही वाचत नाही. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या अस्तानंतर रायगड जिल्ह्य़ात काँग्रेसला उतरती कळा लागली. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते पेण मतदारसंघातून निवडून आले. रत्नागिरी जिल्ह्य़ात काँग्रेसची पार वाताहत झाली. नारायण राणे हे पक्षात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेसला यश मिळाले होते. आता तर राणे हे भाजपवासी झाले.

भाजपचे शिवसेनेला आव्हान

कोकणात शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले असतानाच गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यावर भाजपला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमध्ये केवळ पनवेलची जागाजिंकता आली होती. यंदा मात्र शिवसेनेचे १४ तर भाजपचे १३ आमदार निवडून आले आहेत. मीरा-भाईंदर आणि उरण मतदारसंघांमधून निवडून आलेले दोन अपक्ष हे भाजपचे बंडखोर आहेत. राष्ट्रवादीची ताकद घटली आहे. वसई तालुक्यातील वसई आणि नालासोपारा तसेच बोईसरची जागाजिंकून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ

एकूण जागा – ३९

शिवसेना – १४

भाजप – १३

राष्ट्रवादी काँग्रेस – ५

बहुजन विकास आघाडी – ३

अपक्ष – २ (दोन्ही भाजप बंडखोर)

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष – १

समाजवादी पार्टी – १