“मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने ८ दिवसांत आधीचा निर्णय बदलून परवानगी देणे अनाकलीय व आश्चर्यकारक आहे. त्यातही दोन दिवसांत मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाने दुसरा अहवाल तयार करणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. त्यामुळे मध्यप्रदेश मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला दिव्य अहवाल महाराष्ट्र सरकारने तातडीने मागवून तेथील आयोगाने पार पाडलेल्या प्रक्रियेचे अवलोकन करावे,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन सावंत म्हणाले, “मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोग हा कमलनाथ सरकारने नेमल्याने शिवराजसिंह यांनी त्रिसदस्यीय वेगळ्या आयोगाची स्थापना केली. या आयोगातील बहुसंख्य सदस्य कोणतेही तज्ञ नसून राजकीय पार्श्वभूमीचे आहेत. सदर आयोगाला अजूनही वेगळे कार्यालय व पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात पहिला अहवाल सादर करताना अजून संशोधन व चौकशी कार्य बाकी आहे असे स्वतः आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले होते.”

“निकालानंतर दोनच दिवसांत अंतिम अहवालाचा चमत्कार”

“१० मे रोजी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सरळ सरळ सांगितले होते की ट्रिपल टेस्ट प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आम्ही हा अहवाल पाहणार नाही. तसेच सदर प्रक्रिया ही अत्यंत किचकट व वेळकाढू आहे हे स्वतः न्यायालयाने मान्य केले व १० मे रोजी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. निकालानंतर दोनच दिवसांत मध्य प्रदेश आयोगाने राज्य सरकारला अंतिम अहवाल सादर करण्याचा चमत्कार केला आहे,” असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.

“ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली हे आश्चर्यकारक”

सचिन सावंत पुढे म्हणाले, “याच दिव्य अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने आठच दिवसांपूर्वी दिलेला निर्णय बदलून ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली हे आश्चर्यकारक आहे. निवडणुकीला संमती देताना न्यायालयाने तो अचूक आहे असे सांगितले नाही. त्यामुळे मविआ सरकारने हा दिव्य अहवाल मागवून त्याचे अध्ययन करावे. तसेच सर्वेक्षण व सादर केलेले पुरावे तपासून घ्यावे.”

हेही वाचा : “महाराष्ट्राला मध्य प्रदेशच्या आधी ओबीसी आरक्षण मिळू शकलं असतं, कारण…”, फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

“मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सदर अहवाल कोणालाही दाखवला गेलेला नाही. सर्वेक्षण अदृश्य अवस्थेत झाले असल्याची टीका मध्य प्रदेशमध्ये करण्यात येत असली तरी ओबीसी आरक्षणासंबंधातील मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महाराष्ट्राला दिशादर्शक ठरु शकेल अथवा देशातील स्थितीदर्शक तरी ठरु शकेल,” असेही सावंत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress question madhya pradesh report on obc reservation in two days pbs
First published on: 19-05-2022 at 18:24 IST