मुंबई : जयपूर – वांद्रे एक्स्प्रेसमध्ये चालत्या गाडीत चार जणांच्या टोळीने दरोडा घातला. त्यांनी एका दा्म्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले. दाम्पत्याने जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी त्यांच्याकडील सात लाखांचा मुद्देमाल असलेली एक बॅग पळवून नेण्यात यशस्वी झाले. ही घटना जोगेश्वरी आणि मालाड रेल्वे स्थानकांदरम्यान शनिवारी दुपारी घडली.
जोगेश्वरीत राहणारे बांधकाम व्यावसायिक अयुब खान (३६) पत्नी हिना (३०) मुलगी सायरा (७) मुलगा अब्बान (११) यांच्यासह एप्रिल महिन्यात राजस्थान येथील फत्तेपूर जिल्ह्यातील गावी गेले होते. ते शुक्रवारी रात्री मुंबईला येण्यासाठी निघाले. वांद्रे जयपूर एक्स्प्रेसमधील वातनुकूलित श्रेणीच्या डब्यातून खान कुटंबीय मुंबईत परत येत होते.
शनिवारी दुपारी गाडी मुंबईत दाखल झाली. गाडी अंधेरी स्थानकात थांबणार होती. बोरिवली स्थानकानंतर गाडीचा वेग मंदावला. गाडी मालाड स्थानकाच्या पुढे गेली असता दुपारी साडेबाराच्या सुमारास एका अनोळखी इमसाने हिना खान यांना अंधेरी स्थानक येत असून सामान काढून ठेवा असे सांगितले. खान दांपत्याकडे चार बॅगा, एक पुठ्ठ्याचा बॉक्स असे सामान होते. त्यांनी आपल्या बॅगा दरवाज्याजवळ आणल्या. त्या अनोळखी इसमाने खान दाम्पत्याला सामान दरवाज्याजवळ आणण्यास मदत केली.
त्याचवेळी आणखी तीन अनोळखी इसम तेथे आले आणि सामानाजवळ घेराव करून उभे राहिले. यामुळे अयुब खान यांना संशय आला. त्यांनी याबाबत विचारणा केली असताना त्यातील एका इसमाने चाकू काढून धमकावले. मात्र न डगमगता खान दाम्पत्याने या चौघांना प्रतिकार केला. खान दाम्पत्याकडून झालेला विरोध पाहून एकाने चालत्या गाडीतून उडी मारली. हिना यांनी अन्य एकाला, तर अयुब यांनी दुसऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांनी आपली सुटका करून घेतली. हे चौघेही गोरेगाव – जोगेश्वरी स्थानकांदरम्यान उडी मारून पळून गेले. मात्र तोपर्यंत त्यांनी खान दाम्पत्याची एक ट्रॉली बॅग पळवून नेली.
या बॅगेत एकूण सात लाखांचे दागिने आणि रोख रक्कम होती. त्यात दीड लाख रोख, १ लाखांचे सौदी रियाल (भारतीय चलनानुसार साडेचार हजार रुपये) तसेच ५ तोळ्याचा साडेचार लाख रुपयांचा हार असा ऐवज होता. खान दांपत्याने दोन चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याकडील बॅगा त्यांची हाती लागल्या. चोरांच्या बॅगा त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केल्या.
याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात कलम ३०९ (४) आणि ३(५) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार घडला. आम्ही सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहोत, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली.