मुंबई : मुंबई शहरातील गुन्हेगारी २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३५ टक्क्यांनी कमी झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महिला आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे प्रमाणही कमी झाले आहेत. तर गुन्हांची उकल करण्याचे प्रमाण २०२३ मध्ये ७६ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र त्याच वेळी सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे (एनसीआरबी) देशभरातील गुन्ह्यांची नोंद, आकडेवारी आणि विश्लेषण करण्यात येते. दरवर्षी एनसीआरबीकडून भारताचा गुन्हे अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून विविध राज्ये व शहरांमधील गुन्ह्यांची स्थिती व प्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकण्यात येतो. एनसीआरबीने देशातील २०२३ मधील गुन्ह्यांची स्थिती दर्शविणार अहवाल नुकताच प्रसिध्द केला.

मुंबईतील गुन्हे घटले

मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख उतरता असल्याचे २०२३ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील गुन्हेगारीत २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत २०२२ मध्ये विविध प्रकारचे एकूण ६९ हजार २८९ गुन्हे नोंदवले गेले होते. हे प्रमाण २०२३ मध्ये ४४ हजार ८७३ इतके होते. म्हणजेच २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबईतील गुन्ह्यांचे प्रमाण २४ हजार ४१६ ने ( ३५ टक्के) कमी झाले आहे. त्यामुळे नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या श्रेणीत मुंबईत देशात १६ व्या स्थानावर आहे. २०२३ मध्ये हत्या (१२३), चोरी (६४२), चोरीचा प्रयत्न (२०), जबरी चोरी (६६७५), वाहन चोरी (२६७१), दुखापत (४४४१) आदी गुन्हे नोंदविले गेले होते.

महिला आणि अल्पवयीन मुलांचे अत्याचारही घटले

मुंबईतील महिलावरील अत्याचारांच्या गुन्ह्यातही २०२३ मध्ये घट झाली आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २.५ टक्क्यांनी घटले आहे. बलात्कार (९७३), अपहरण (११६७) विनयभंग (२१६३), लैंगिक छळ (६२६) मानसिक छळ (७४६) आदीं गुन्ह्यांची २०२३ मध्ये नोंद झाली आहे. अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचारांचे प्रमाणही २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २.१ टक्क्यांनी कमी झाले आहेत. बलात्कार (५८६), विनयभंग (४९५) छेडछाड (२०) आदी गुन्ह्यांची २०२३ मध्ये नोंद झाली आहे. मुंबईतील वरिष्ठ नागरिकांविरुद्धचे गुन्हेही ९ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

सायबर गुन्ह्यात वाढ

एकीकडे मुंबईतील इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र ऑनलाईन फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे (फोर्जरी) या बाबतीत मुंबई २०२३ मध्ये आघाडीवर आहे. सायबर गुन्ह्यांच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर असून, महिलांविरुद्ध पाठलाग (सायबर स्टॉकिंग) आणि छेडछाडीच्या बाबतीत दिल्लीपाठोपाठ मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या २०२२ मध्ये ६५ हजार ८९३ होती, ती २०२३ मध्ये ८६ हजार ४२० एवढी झाली. बनावट समाज माध्यम (सोशल मीडिया) खात्यांमध्ये ३० टक्के, बनावट मेल (स्पूफिंग) मध्ये ५५.३ टक्के, तर डेटा चोरीच्या प्रकरणांत १७,६ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे कार्ड फसवणुकीत ११.९ टक्के, अश्लील ई-मेलमध्ये ३८ टक्के, धार्मिक / सामुदायिक पोस्टमध्ये १६.७ टक्के, तर सेक्स्टॉर्शनमध्ये (अश्लील कृत्याआधारे खंडणी) ३३. ३ टक्के घट झाली आहे.

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७६ टक्के

मुंबईतील गुन्हे उकलण्याचे प्रमाण २०२२ मधील ६८ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. गुन्हे प्रकटीकरणात दिल्ली पहिल्या क्रमांकावर, मुंबई दुसऱ्या आणि बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईभरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, कॉल डाटा तपशील आणि मोबाइल ट्रेसिंग सिस्टीम यामुळे गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले आहे.