मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खालिद वसी खान (५१) या व्यक्तीकडून दीड कोटींचे हेरॉइन जप्त केले. अटकेत असलेला खान मुंबई गुन्हे शाखेचा विशेषत: अंमली पदार्थ विरोधी पथकाचा खबरी म्हणून काम करत होता. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिलेल्या महितीनुसार, सहायक निरीक्षक अमर मराठे, सुदर्शन चव्हाण आणि पथक मंगळवारी रात्री डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, माझगाव परिसरात गस्त घालत होते. तेव्हा आरोपी संशयास्पदरित्या वावरताना आढळला. झडतीत या व्यक्तीकडून ४७० ग्रॅम हेरॉइन सापडले. या साठय़ाचे मूल्य एक कोटी ४१ लाख इतके आहे. कारवाई दरम्यान खान याने खबरी असून गुन्हे शाखेने दिलेल्या प्रशस्ती पत्राबाबत उल्लेख केला. त्या पत्राची खातरजमा अंमली पदार्थ विरोधी पथक करणार आहे.

मुंब्रा येथे राहणारा खान मुंबई, ठाण्यात पोलीस खबरी असल्याचे सांगत अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी उकळतो. तसेच स्वत: अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करतो, अशी माहिती त्याच्या चौकाशीतून पुढे आली. याआधी त्याला गांजाच्या साठय़ासोबत अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणातून त्याला निदरेष मुक्त केले. त्याच्या पत्नीविरोधातही अंमली पदार्थ तस्करी, विक्रीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

तोतया पोलिसांकडून फसवणूक :- मुंबई : सोन्याची बिस्किटे कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत ती खरेदी करायला आलेल्या ग्राहकाला तोतया पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी इरफान मलिक (४७) या आरोपीला अटक केली आहे. तर दीपक शिंदे (३३) या आरोपीला आधीच्या एका प्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या पोलिसांनी दिली.

इरफान हा सोन्याची बिस्किटे स्वस्तात देतो असे सांगून ग्राहकाला एका हॉटेलमध्ये बोलवत असे. तेथे ग्राहकाला बनावट बिस्किटे सोन्याची म्हणून दाखविली जात. दाखविलेली सोन्याची बिस्किटे खरी आहेत, अशी ग्राहकांची खात्री झाली की त्यांच्याकडे  पैशांची मागणी करत. अशा प्रकारे इरफान याने दहिसर येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला बोलाविले होते. या ग्राहकाला सोन्याची बिस्किटे देऊन त्याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर ग्राहक हॉटेलमधून बाहेर आल्यावर तेथे इरफान याने सहकाऱ्यांच्या साहाय्याने तोतया पोलिसांकरवी ग्राहकाकडील सोन्याची बिस्किटे घेऊन पोबारा केला. आपण फसविले गेलो आहोत, याची खात्री होताच या ग्राहकाने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस असल्याचा बनाव रचून फसवणूक केली आहे, याची माहिती होताच प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या कक्ष १२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांनी तपास करत आरोपी इरफानला ताब्यात घेतले. इरफान आणि दीपक यांच्या टोळीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अशा प्रकारे फसवणूक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी अटकेत :- परदेशात विशेषत: आखाती देशात मोठय़ा पगाराची नोकरी देतो, असे आमिष दाखवून फसवणाऱ्या आणखी एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपी गजाआड केले. या टोळीने महाराष्ट्रासह पंजाब, ओरिसा, बिहार, गुजरात येथील तरुणांचीही फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

मशीद बंदर स्थानकाशेजारील पटवा चेंबर्स या इमारतीत कार्यालय थाटून भामटय़ांनी अनेक राज्यांतील तरुणांची फसवणूक सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष एकचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांना मिळाली होती. कक्षातील पोलीस निरीक्षक महेश तावडे, सहायक निरीक्षक अनंत शिंदे आणि पथकाने या माहितीची खातरजमा करून फसवणूक झालेल्या तरुणांपैकी दोघा-तिघांना विश्वासात घेतले. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पटवा चेंबर्स इमारतीतील संबंधित कार्यालयात छापा घालून अक्रम शेख आणि शाबीर अकबर मास्टर ऊर्फ मुन्ना या दोन आरोपींना अटक केली.

या दोघांनी आखाती देशांतील नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांकडून आगाऊ रक्कम स्वीकारली होती. परदेशी कंपन्यांची बनावट कागदपत्रे, बनावट व्हिसा तयार करून हे आरोपी या तरुणांकडून उर्वरित पैसे स्वीकारून पसार होण्याचा कट आखत होते. त्यांच्या अटकेने अनेक तरुणांची फसवणूक रोखली गेली.