राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक निमंत्रित उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील विरोधकांच्या उपस्थितीवरुन टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 “मला आज नुतनीकरण केलेल्या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री म्हणून इथे आल्याचा वैयक्तिक आनंद होत आहे. राजभवन, दरबार हॉल आमच्यासाठी नवीन नाही. विरोधी पक्षात असताना वर्षात एखाद दुसऱ्या वेळी शिष्टमंडळ घेऊन राजभवनात येत होतो. अगदी रोज काही येत नव्हतो पण एखाद दुसऱ्यावेळेला येत होतो. राज्यपालांना भेटून त्यांना आमच्या व्यथा सांगायचो. आजही आवश्यकता असते तेव्हा आमचा संवाद सुरुच असतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

“या वास्तूने अनेक घटना पाहिलेल्या आहेत. याच वास्तूतून ३० एप्रिल १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले होते त्याचा मला विशेष अभिमान वाटतो. या वास्तूच्या नुतनीकरणात ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. कदाचित आपले राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. इथे राजकीय हवा कशीही असू द्या पण हवा थंडच असते. इथे साप आणि मोरही आढळून येतात. अशी वास्तू शोधूनही सापडणार नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने तोडून मॉर्डन अशी वास्तू उभी करतो. पण त्याचवेळी आपली संस्कृतीसुद्धा जपणे आव्हानात्मक असते. या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, ८ डिसेंबर २०२१ रोजी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उदघाटन निश्चित झाले होते. पण तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of the cm uddhav thackeray during the inauguration of the new durbar hall on raj bhavan abn