मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सुमारे साडेआठ कोटी रुपये किंमतीच्या गांजासह तीन महिलांना मंगळवारी अटक केली. जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत साडेआठ कोटी रुपये. बँकॉकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केली जात असून गेल्या सहा महिन्यात मुंबई विमानतळावरून १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

मुंबई विमानतळावर कारवाई

बँकॉकहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन महिलांना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबवले. त्याची झडती घेण्यात आली. त्यांच्या बॅगमध्ये सुमारे ८६३६ ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर या गांजाची किंमत आठ कोटी ६३ लाख रुपये आहे. तिन्ही महिला भारतीय नागरिक आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे प्रियंका कुमार (४४), इशिता कतारी (१९) व आस्माबानो रज्जाब अशी आहेत. त्यापैकी प्रियंका दिल्लीतील रहिवासी आहे, इशिता मध्य प्रदेशातील भोपाळ येथील, तर आस्माबानो गुजरातमधील रहिवासी आहे. प्रियंका व इशिताकडून प्रत्येकी ३२४७ ग्रॅम व आसमाबानोकडून १८६६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. आरोपी महिलांच्या बॅगेमधून हिरव्या रंगाची पाने जप्त करण्यात आली. तपासणीत जप्त करण्यात आलेला पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. ब्राझीलमधील तस्कराच्या टोळीचा यामध्ये हात असल्याचा संशय आहे. त्यापैकी एका महिलेच्या मोबाइलमध्ये ब्राझीलमधील एका महिलेचा मोबाइल क्रमांक सापडला असून तिनेच या महिलांना गांजा दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहे.

पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्ग मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बँकॉकहून ७५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.