मुंबई : मोंथा चक्रीवादळ निवळल्यानंतर छत्तीसगड परिसरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.छत्तीसगडमध्ये तयार झालेली हवामान प्रणाली ईशान्येकडे वाटचाल करीत असून झारखंडच्या वायव्य भागात आहे. ही प्रणाली उत्तर वायव्येकडे वाटचाल करीत बिहार ओलांडल्यानंतर त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार – पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस मात्र पडणार नाही.

ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या सरी बरसतील. गेले काही दिवस मुंबईसह इतर भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात काहीशी घट होऊन दिलासा मिळाला होता. आता मात्र पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण मधूनच पाऊस अशा वातावरणामुळे तापमानात चढ – उतार शक्य आहे. मुंबईत शुक्रवारी सायंकाळी वांद्रे – कुर्ला संकुल, पवई, भायखळा, परळ, दादर परिसरात हलक्या सरी बरसल्या. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सायंकाळी ५ नंतर पावसाची रिपरिप सुरू होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी कमी नोंदले गेले होते. पावसामुळे सध्या मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस असह्य उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत होता.

मुंबईची हवा ‘समाधानकारक’

मुंबईची हवा शुक्रवारी ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा हवा निर्देशांक शुक्रवारी ६४ इतका होता. भायखळा येथील हवा निर्देशांक ४८, चेंबूर ४०, कुलाबा ४२, कांदिवली ४६, भांडूप ४२ आणि माझगाव येथे ४७ इतका होता. म्हणजेच येथील हवा ‘चांगल्या’ श्रेणीत नोंदली गेली. इतर भागातील हवा देखील ‘चांगली’ ते ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा झाली आहे.