मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ने आध्यात्मिक पर्यटनाकडे अधिक लक्ष वळवले आहे. ऑगस्ट महिन्यात दादरवरून रेल्वेमार्गाने अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रेचे नियोजन आयआरसीटीसीने केले आहे.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ‘नवरत्न’ सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू केली आहे. १४ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्थानकावरून ही गाडी मार्गस्थ होईल. काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे या सहलीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सहलीसाठी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी चार्टर्ड द्वितीय वातानुकूलित डब्याची सुविधा केली आहे. त्यासोबतच राहण्याची व्यवस्था, सकाळचा नास्ता आणि रात्रीचे जेवण, वातानुकूलित बसमधून दर्शन, व्यावसायिक टूर एस्कॉर्ट्स आणि प्रवास विमा – हे सर्व समावेशक पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. यासाठी प्रति व्यक्ती ३४,७०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले की, ही सहल ८ रात्री आणि ९ दिवसांची असून त्यात भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. या सहलीदरम्यान भाविकांना काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर धार्मिक स्थळांना परवडणाऱ्या दरात भेट देण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
या सहलीदरम्यान वाराणसी मधील काशी विश्वनाथ मंदिर, संकट मोचन मंदिर, भारत माता मंदिर, तुळशी मानस मंदिर, काल भैरव मंदिर आणि सारनाथ ही प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना बघता येताल. अयोध्येत रामजन्मभूमी, लक्ष्मण घाट, हनुमान गढी, कनक भवन मंदिर आणि शरयू नदीला भेट देण्यात येईल. प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम आणि स्थानिक प्रेक्षणीय स्थळी सहल जाईल.
ही सहल १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर येथून गाडी क्रमांक ०१०२७ दादर – वाराणसी विशेष रेल्वे गाडीने सुरू होईल. तर, परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२६ प्रयागराज-दादर विशेष रेल्वेगाडीने मुंबईत येता येईल. सहलीसाठी निश्चित केलेल्या द्वितीय वातानुकूलित डब्यामध्ये ४४ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करावे, असे आवाहन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)ने केले आहे.