मुंबई : मधुमेह झालेल्या रुग्णांच्या पायाला होणाऱ्या जखमा (डायबेटिक फूट अल्सर) ही गंभीर आणि वाढती समस्या असून या समस्येमुळे अनेकदा रुग्णांना पाय गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा विभागाने (डीएई) ‘कोलो-नॉक्स’ ही नायट्रिक ऑक्साईडवर आधारित उपचार पद्धती विकसित केली असून मधुमेही रुग्णांची जखम बरी करण्यासाठी ही तंत्रज्ञानाधारित नवी पद्धत भारतात प्रथमच उपलब्ध झाली आहे. डायबेटिक फूट अल्सरच्या व्यवस्थापनातील ही मोठी प्रगती मानली जात आहे.
भारतामधील मधुमेहाचे प्रमाण वाढत असून मोठ्या संख्येने रुग्णांना डायबेटिक फूट अल्सरचा धोका निर्माण होत आहे. अशा रुग्णांना प्रभावी उपचारांची आवश्यकता भासते. या रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यास त्यांचा पाय कापण्याची वेळ येते. ही बाब लक्षात घेता भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ‘कोलो-नॉक्स’ ही नायट्रिक ऑक्साईडवर आधारित मलमपट्टी करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. ‘कोलो-नॉक्स’ ही मलमपट्टी थेट जखमेवर उपचारात्मकदृष्ट्या अनुकूलित नायट्रिक ऑक्साईड पोहोचवून उपचार प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवते. नायट्रिक ऑक्साईडच्या सूक्ष्मजीवरोधक आणि पुनरुत्पादक गुणधर्मांमुळे जखम लवकर भरण्यास मदत होते. यातील कोलेजेन हायड्रोजेल दुखणे कमी करण्यास, तसेच जखमेतील स्राव शोषून घेण्यास सहाय्य करते. त्यामुळे जखम बरी होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते.
बीएआरसीने सप्टेंबर २०१८ मध्ये या तंत्रज्ञानाबाबत पेटंट घेतल्यानंतर कोलोजेनेसिस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सकारात्मक निष्कर्षांनंतर बीएआरसीच्या तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमाअंतर्गत या उत्पादनासाठी कोलोजेनेसिस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विशेष परवाना दिला. ‘कोलो-नॉक्स’च्या उत्पादन आणि विक्रीसाठी कोलोजेनेसिस प्रायव्हेट लिमिटेडने डीसीजीआयकडून अधिकृत परवाना मिळवला आहे. त्यामुळे लवकरच ही उपचार पद्धती नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
प्रयोगशाळेत विकसित तंत्रज्ञान प्रत्यक्ष बाजारात आणण्याच्या प्रक्रियेतील हा टप्पा महत्त्वाचा असून ‘कोलो-नॉक्स’च्या उपलब्धतेमुळे डायबेटिक फूट अल्सरच्या उपचारात सुधारणा होईल आणि रुग्णांच्या पायाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे बीएआरसीचे संचालक विवेक भसीन यांनी सांगितले. अणुऊर्जा विभागाच्या संशोधनातून साकारलेल्या या नव्या उत्पादनामुळे भारतातील डायबेटिक फूट अल्सर उपचार पद्धतीत नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘कोलो-नॉक्स’मुळे भारतातील परवडणाऱ्या व प्रभावी डायबेटिक फूट अल्सर उपचारांच्या उपलब्धतेत महत्त्वाची वाढ होईल, ही संकल्पना ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’च्या उपक्रमांनाही पूरक आहे.- डॉ. अजीत कुमार मोहंती, सचिव अणुऊर्जा विभाग, आणि अध्यक्ष, अणुऊर्जा आयोग
