Mumbai Dahi Handi 2025 Celebration : मुंबई शहर व उपनगर, ठाणे व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असूनही गोविंदांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुसळधार पाऊस आणि माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयासमोरील वीर मेजर रमेश दडकर मैदानात चिखल असूनही महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन गोविंदांचे पथक अशी ओळख असलेल्या नयन फाऊंडेशनच्या गोविंदाच पथकाने चार थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली.
ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम, गोविंदा रे गोपाळा, मच गया शोर सारी नगरी रे या गाण्यांवर दहीहंडीप्रेमी मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार अनुभवत आहेत. मात्र मुसळधार पाऊस व मैदानात चिखल असूनही नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाच्या दृष्टिहीन गोविंदांनी चार थर रचून यशस्वीरित्या उतरविले आहेत. थर रचल्यानंतर दृष्टिहीन गोविंदांनी बँजोच्या तालावर मनसोक्तपणे नृत्यही केले. नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाला रुईया महाविद्यालयाच्या आजी – माजी विद्यार्थ्यांसह अधारिका फाऊंडेशनने सहकार्य केले, त्यांच्याकडून गोविंदांच्या संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे.
नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाबद्दल जाणून घेऊ या
दृष्टीहीन तरुण-तरुणींच्या अंधःकार आयुष्यात निसर्गरम्य भटकंतीने आनंदाचा प्रकाश देऊन त्यांना गिर्यारोहण करता यावे, या उद्देशाने नयन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. गिर्यारोहणानंतर बुध्दीबळ स्पर्धा, योग प्रात्यक्षिके आदी विविध कार्यक्रमांची आखणी या संस्थेने केली आणि त्यानंतर एक पाऊल पुढे जात २०१३ साली दृष्टिहिनांचे साडेतीन थर रचत नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर नयन फाऊंडेशनच्या जिद्दी गोविंदांनी मागे वळून पाहिले नाही.
जिद्द आणि सरावाच्या जोरावर विविध ठिकाणी चार थरांचा मानवी मनोरा रचण्यात येतो. माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयासमोरील वीर मेजर रमेश दडकर मैदानात दृष्टिहीन गोविंदांचा मानवी मनोरे रचण्याचा सराव सुरू असतो. विशेष बाब म्हणजे २०१९ मध्ये नयनच्या दृष्टीहीन तरुणांनी पहिल्यांदाच पाच थर रचून दिमाखात सलामीही दिली होती.